Join us

Kotak Mahindra Bank ला रिझर्व्ह बँकेकडून दिलासा; अनेक निर्बंध हटवले, काय आहे प्रकरण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 11:25 IST

Kotak Mahindra Bank RBI: नियमांचं पालन न केल्यानं रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) वेळोवेळी अनेक बँकांवर दंड आणि अनेक निर्बंध लादते. आरबीआयनं गेल्या वर्षी कोटक महिंद्रा बँकेवर अनेक निर्बंध लादले होते.

Kotak Mahindra Bank RBI: नियमांचं पालन न केल्यानं रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) वेळोवेळी अनेक बँकांवर दंड आणि अनेक निर्बंध लादते. नियमांचं पालन न केल्याबद्दल आरबीआयनं गेल्या वर्षी कोटक महिंद्रा बँकेवर अनेक निर्बंध लादले होते. आता आरबीआयने बँकेवर लादलेले सर्व निर्बंध हटवले आहेत. कोटक बँकेनं आपल्या त्रुटी दूर करण्यासाठी आवश्यक पावलं उचलली असून सर्व नियमांचं पालनही केलंय, असं सांगत आरबीआयने बँकेवरील सर्व निर्बंध हटवले.

नियमांचं पालन न केल्यानं कारवाई

गेल्या वर्षी आरबीआयनं कोटक महिंद्रा बँकेवर नियमांचं पालन न केल्यानं अनेक निर्बंध लादले होते. बँकेनं आपल्या ऑनलाइन आणि मोबाइल बँकिंग चॅनेलद्वारे नवीन ग्राहकांना ऑनबोर्ड करण्यास आणि नवीन क्रेडिट कार्ड जारी करण्यास बंदी घातली होती. आता आरबीआयनं कोटक महिंद्रा बँकेकडून हे सर्व निर्बंध उठवले आहेत. अशा परिस्थितीत कोटक महिंद्रा बँक आता नवे ग्राहक जोडू शकते. यासोबतच नवीन क्रेडिट कार्डही जारी केले जाऊ शकतात.

काय आहे प्रकरण?

गेल्या वर्षी २४ एप्रिल २०२४ रोजी रिझर्व्ह बँकेला कोटक महिंद्रा बँकेनं अनेक नियमांचं पालन केलं नसल्याचं आढळले होते. आरबीआयनं २०२२ आणि २०२३ साठी आयटी इन्व्हेंटरी मॅनेजमेंट, व्हेंडर रिस्क मॅनेजमेंट आणि डेटा प्रोटेक्शनमध्ये गंभीर त्रुटी आणि अनुपालन न केल्याचं सांगत बँकेवर निर्बंध लादले होते. यानंतर आरबीआयनं कोटक महिंद्रा बँकेवर बँकिंग रेग्युलेशन अॅक्ट १९४९ च्या कलम ३५ अ अंतर्गत कारवाई केली होती.

टॅग्स :बँक