Kotak Mahindra Bank: देशातील महागाई दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. सर्वसामान्य जनतेच्या खिशावरील भार वाढताना पाहायला मिळत आहे. अगदी रोजच्या गरजेच्या वस्तूंचे दरही गगनाला भिडल्यामुळे सामान्य जनता अगदी त्रस्त झाली आहे. यातच आता खासगी क्षेत्रातील एका बँकेने डेबिड कार्डावरील चार्ज वाढवला आहे. २२ मेपासून हे नवे दर लागू होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खासगी क्षेत्रातील बँक असलेल्या कोटक महिंद्रा बँकेने डेबिट कार्ड सुविधेसाठी वार्षिक शुल्कात वाढ केली आहे. नवीन नियम २२ मे २०२३ पासून लागू होणार आहे. डेबिट कार्डचे वार्षिक शुल्क सध्या १९९ रुपये अधिक GST आकारले जात आहे. बँकेने आपल्या ग्राहकांना २२ मेपासून डेबिट कार्डच्या शुल्कात वाढ करण्याबाबत माहिती दिली आहे. डेबिट कार्ड व्यतिरिक्त कोटक महिंद्रा बँकेने इतर सेवांवरही शुल्क वाढवले आहे. यामध्ये किमान बॅलन्स न ठेवणे, व्यवहार अयशस्वी होणे, संबंधित व्यवहार तपासणे इत्यादीसाठी हे शुल्क कोटक महिंद्रा बँकेच्या सर्व प्रकारच्या खात्यांमधून वसूल केले जाणार आहे, यासंदर्भातील माहिती कोटक महिंद्रा बँकेने दिली आहे.
डेबिट कार्ड वार्षिक शुल्काच्या विद्यमान दरात ६० रुपयांची वाढ
तुमच्या खात्यातील अपुर्या शिलकीमुळे व्यवहार फेल झाल्यास तुमच्याकडून प्रति व्यवहार २५ रुपये आकारले जातील. तसेच दरमहा एकापेक्षा जास्त वेळा पैसे काढल्यास प्रत्येक व्यवहारासाठी १० रुपये द्यावे लागतील. याशिवाय, कोटक महिंद्रा बँकेने डेबिट कार्ड वार्षिक शुल्काच्या विद्यमान दरात ६० रुपयांची वाढ केली आहे. सध्या हे शुल्क १९९ रुपये अधिक जीएसटी दराने घेतले जात आहे. दुसरीकडे २२ मे २०२३ पासून तुम्हाला कोटक महिंद्रा बँक डेबिट कार्डवर २५९ रुपये वार्षिक शुल्क आणि GST भरावा लागेल. याशिवाय डेबिट कार्ड हरवले किंवा चोरीला गेल्यास नवीन कार्ड घेण्यासाठी तुम्हाला २०० रुपये द्यावे लागतील, असे सांगितले जात आहे.
बँक खात्यात किमान बॅलन्स ठेवू शकत नसल्यास...
कोटक महिंद्रा बँक खात्यात किमान बॅलन्स ठेवू शकत नसल्यास बँक ६ टक्क्यांपर्यंत शुल्क आकारू शकते. याशिवाय प्रत्येक वेळी चेक जारी करताना आणि गैर-आर्थिक कारणांसाठी परत केल्यावर ५० रुपये शुल्क आकारले जाऊ शकते. तसेच जमा केलेल्या आणि परत केलेल्या चेकसाठी प्रत्येकी २०० रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे. बँकेच्या महत्त्वाच्या सूचना (SI) न पाळल्याबद्दल २०० रुपये आकारले जातील.
दरम्यान, कोटक महिंद्रा बँकेने मार्चच्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. गत तिमाहीत बँकेचा निव्वळ नफा २६ टक्क्यांनी वाढून तो ३ हजार ४९५ रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत कोटक महिंद्रा बँकेला २ हजार ७६७ कोटी रुपयांचा नफा झाला होता. कोटक महिंद्रा बँकेने मार्च तिमाहीत २२ लाख नवीन ग्राहक जोडले. मार्च तिमाहीअखेर बँकेची एकूण ग्राहक संख्या ४.१२ कोटी होती, जी एका वर्षापूर्वी याच तिमाहीच्या अखेरीस ३.२७ कोटी होती.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"