Q2 FY24 net profit and NPA: देशातील खाजगी क्षेत्रातील मोठ्या बँकांपैकी एक असलेल्या कोटक महिंद्राबँकेने ( Kotak Mahindra Bank Ltd) सप्टेंबर तिमाहीचे निकाल सादर केले आहेत. या अहवालात बँकेचा एकत्रित नफ्यात २३.६ % ची विक्रमी वाढ झाली. हा नफा ३ हजार ५७९ कोटी रुपयांवरून ४ हजार ४२३ कोटी रुपयांवर पोहोचला. तर दुसरीकडे बँकेचे व्याज उत्पन्न देखील ६ हजार ६०९ कोटी रुपयांवरून ८ हजार १८१ कोटी रुपये झाले आहे. वार्षिक आधारावर बँकेच्या व्याज उत्पन्नातही सुमारे २४ टक्क्यांची वाढ नोंदवली आहे.
सप्टेंबर तिमाहीचे निकालानंतर कोटक महिंद्रा बँकने खांदेपालट केली आहे. उदय कोटक यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर पुढला उत्तराधिकारी कोण हा प्रश्न होता. त्यानंतर बँकेने अशोक वासवानी यांना नवीन व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त केले. या नियुक्तीला भारतीय रिझर्व्ह बँकेनेही (Reserve Bank of India) मंजुरी दिली आहे. वासवानी (Ashok Vaswani) यांचा कार्यकाळ पदभार स्वीकारल्यापासून तीन वर्षांच्या कालावधीसाठी असणार आहे. बँकेचा पदभार त्यांनी १ जानेवारी २०२४ पूर्वी घेणे आवश्यक आहे.
कोण आहेत अशोक वासवानी?
यापूर्वी अशोक वासवानी हे २०१६ ते २०१९ पर्यंत ब्रिटनमध्ये Barclays चे CEO होते. २०१९ ते २०२१ दरम्यान, त्यांनी ब्रिटीश बँकेसाठी जागतिक ग्राहक आणि पेमेंट सीईओ म्हणूनही काम केले. नोव्हेंबर २०२१ ते जुलै २०२२ दरम्यान, ते बँकेतून निवृत्त होण्यापूर्वी, बार्कलेज येथे मुख्य डिजिटल अधिकारी म्हणून कार्यरत होते. तसेच वासवानी हे सिटीग्रुप एशिया पॅसिफिकचे सीईओ आणि सिटीग्रुप ग्लोबल ऑपरेटिंग आणि मॅनेजमेंट कमिटीचे सदस्य होते. कोटक महिंद्रा बँकेत नियुक्तीपूर्वी वासवानी अमेरिका-इस्रायली AI फर्म पगाया टेक्नॉलॉजीजमध्ये अध्यक्ष म्हणून कार्यरत होते.
उदय कोटक यांचा अचानक राजीनामा-
कोटक महिंद्रा बँकेचे संस्थापक एमडी आणि सीईओ उदय कोटक यांनी 2 सप्टेंबर रोजी अचानक आपल्या पदाचा राजीनामा जाहीर केला होता. ते 31 डिसेंबर रोजी बँकेतून निवृत्त होणार होते. कोटक यांनी अचानक माघार घेतल्यामुळे बँकेच्या संचालक मंडळाने अंतरिम सीईओ म्हणून दिपक यांची नियुक्ती केली होती. आता बँकेची सुत्रे अशोक वासवानी यांच्या हातात सोपविण्यात आली आहेत.
बँकेच्या 'एनपीए'मध्ये घट-
सप्टेंबर तिमाहिच्या निकालांसोबतच बँकेच्या मालमत्तेच्या गुणवत्तेतही सुधारणा झाली आहे. सप्टेंबर तिमाहीत, कोटक महिंद्रा बँकेचा ग्रॉस एनपीए (NPA) तिमाही-दर-तिमाही १.७५ % वरून १.६९ % वर आला आहे, तर नेट एनपीए देखील ०.४३ % वरून ०.३९ % वर आला आहे.