Kotak Mahindra Bank Q4: खासगी क्षेत्रातील कोटक महिंद्रा बँकेनं ३१ मार्च २०२४ रोजी संपलेल्या आर्थिक वर्ष २०२४ च्या चौथ्या तिमाहीचे निकाल आज जाहीर केले. या तिमाहीत बँकेला ४,१३३ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे, जो गेल्या वर्षीच्या ३,४९६ कोटी रुपयांच्या तुलनेत १८ टक्क्यांनी अधिक आहे.
अपेक्षेपेक्षा चांगले निकाल
३१ मार्च २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीत कोटक महिंद्रा बँकेचं व्याजाद्वारे मिळणारं उत्पन्न १३ टक्क्यांनी वाढून ६,९०९ कोटी रुपये झालं आहे. कोटक बँकेचा निकाल अपेक्षेपेक्षा चांगला लागला आहे. सीएनबीसी-टीव्ही १८ नं केलेल्या सर्वेक्षणात बँकेचा नफा ३,३७६.९ कोटी रुपये आणि व्याजाद्वारे मिळणारं उत्पन्न ६,६७०.२ कोटी रुपये असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. परंतु ही आकडेवारी ४,१३३.३ कोटी आणि ६,९०९.४ कोटी रुपये इतकी आहे.
असेट क्वालिटीमध्ये सुधारणा
या कालावधीत बँकेचा जीएनपीए (ग्रॉस एनपीए) १.३९ टक्क्यांवर आला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत तो १.७८ टक्के होता. अशा प्रकारे नेट एनपीए (एनएनपीए) देखील वार्षिक आधारावर ०.३७ टक्क्यांवरून ०.३४ टक्क्यांवर आला आहे.
तिमाही आधारावर बँकेचा एकूण एनपीए मागील तिमाहीतील ६,३०१.७ कोटी रुपयांवरून ५,२७४.८ कोटी रुपयांवर आला असून नेट एनपीए १,२२५.३ कोटी रुपयांवरून वाढून १,२७०.६ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. टक्क्यांमध्ये सांगायचं झालं तर तिमाही आधारावर सकल एनपीए १.७३ टक्क्यांवरून १.३९ टक्क्यांवर आला आणि नेट एनपीए ०.३४ टक्क्यांवर कायम राहिला.
नेट इंटरेस्ट मार्जिन ५.२८ टक्के
चौथ्या तिमाहीत कोटक बँकेचं नेट इंटरेस्ट मार्जिन (NIM) तिमाही आधारावर ५.२२ टक्क्यांवरून ५.२८ टक्क्यांवर पोहोचलं आहे. कोटक महिंद्रा बँकेचा शेअर ३ मे रोजी १.८१ टक्क्यांनी घसरून १५४७.२५ रुपयांवर बंद झाला होता.
इकोसिस्टम मजबूत करणार
कोटक महिंद्रा बँकेनं आरबीआयच्या कारवाईचा बँकेच्या व्यवसायावर होणारा विपरीत परिणाम कमी करण्यासाठी रिसोर्सेस रिअॅडजस्ट करण्याचा विचार करत असल्याचं म्हटलं आहे. रिझर्व्ह बँकेच्या निर्देशांचा आपल्या एकूण व्यवसायावर फारसा परिणाम होणार नाही, असं बँकेचं मत आहे. बँक आपली आयटी प्रणाली मजबूत करण्यासाठी गुंतवणूक वाढवणार आहे.