कोटक महिंद्रा बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (MD & CEO) उदय कोटक पूर्ण वेळ भूमिकेतून बाहेर पडल्यानंतर नॉन एक्झिक्युटिव्ह बोर्ड मेंबर आणि स्ट्रॅटेजिक शेअर होल्डर म्हणून कायम राहतील. यासंदर्भात त्यांनी आपल्या भागधारकांना एक पत्र लिहिलं आहे.
"मी एक मॅनेजर आहे, बोर्ड गव्हर्नन्स मेंबर आहे आणि एक स्ट्रॅटेजिक शेअरहोल्डरही आहे, ज्याला प्रमोटर म्हटलं जातं. मी माझ्या जीवनाची अनेक वर्ष या ठिकाणी घालवली आहेत," असं उदय कोटक म्हणाले. दरम्यान, ते शेअर होल्डर आणि एक्झिक्युटिव्ह बोर्ड मेंबर म्हणून कायम राहतील.
१९८५ मध्ये सुरूवात
३८ वर्षांपूर्वी १९८५ मध्ये मी ३ जण, ३०० स्क्वेअर फूट ऑफिस आणि काही भांडवल घेऊन ही बँक सुरू केली. हा योग्य वेळी घेतलेला योग्य निर्णय होता. ही बँक भारतीय विकास आणि आर्थिक क्षेत्रातील क्रांतीचा परिणाम असल्याचं उदय कोटक म्हणाले.
१० हजारांची गुंतवणूक
आम्ही आमच्या भागधारकांसाठी व्हॅल्यू निर्माण केली आहे. आजच्या तारखेत या बँकेनं १ लाखाहून अधिक लोकांना थेट रोजगार दिलाय. अनेकांना अप्रत्यक्षपणे रोजगारही मिळत आहे. बँकेचा प्रवास चांगला झालाय. जर एखाद्या गुंतवणूकदारानं १९८५ मध्ये १०००० रुपये गुंतवले असतील तर आज त्याचं मूल्य ३०० कोटी रुपये झाल्याचं त्यांनी नमूद केलं. कोटक महिंद्रा बँकेत प्रवर्तकांची भागीदारी २६ टक्क्यांच्या जवळपास आहे.
निव्वळ नफा वाढला
आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये एकत्रित पातळीवर कोटक महिंद्रा बँकेच्या निव्वळ नफ्यात २३ टक्क्यांची वार्षिक वाढ होऊन ती १४,९२५ कोटी रुपये झाली. आर्थिक वर्ष २०२२-२३ साठी एकत्रित पातळीवर रिटर्न ऑन असेट (ROA) २.६२ टक्के होते (आर्थिक वर्ष २०२१-२२ साठी २.३६ टक्के). बँकेचे स्टँडअलोन नेट इंटरेस्ट मार्जिन (NIM) ५.३३ टक्के (आर्थिक वर्ष २०२१-२२ च्या तुलनेत ७२ बीपीएस अधिक) होते आणि बँकेचा निव्वळ नफा २८ टक्क्यांनी वाढून १०,९३९ कोटी रुपये झाला आहे.