बँक आता आपल्या जीवनाचा महत्त्वाचा भाग बनली आहे. कुठल्या ना कुठल्या कामासाठी आपण बँकेत नक्कीच जातो. पैशांच्या देवाणघेवाणीसाठी चेक हे अतिशय लोकप्रिय माध्यम आहे. तुम्हीही कोणालातरी चेक दिला असेल किंवा घेतला असेल. बँकेच्या चेकवर, आपल्याला भरायची रक्कम शब्द आणि आकड्यात लिहावी लागते. तुमच्या कधी लक्षात आले आहे का की बँकेचा चेक देताना बरेच लोक इंग्रजीत Lakh लिहितात तर काही लोक Lac लिहितात. आता प्रश्न पडतो की या दोघांपैकी योग्य शब्द कोणता? चुकीचा शब्द लिहिला तर चेक रिजेक्ट होईल का?
चेकवर रक्कम अंकात लिहिण्यासाठी एक मानक आहे आणि प्रत्येकजण निश्चित मानकानुसार लिहितो. पण, सर्वात मोठा गोंधळ शब्दात रक्कम लिहिण्याबाबत आहे. सहसा रक्कम इंग्रजीत लिहिली जाते. आता असे होत आहे की लाख लिहिण्यासाठी लोक इंग्रजीत वेगवेगळे स्पेलिंग लिहितात. काहींना लाख लिहिताना Lakh हा शब्द तर काहींना Lac हा शब्द बरोबर वाटतो. इंग्रजी डिक्शनरीनुसार, जर आपण दोन्हीच्या अर्थाबद्दल बोललो तर तर Lakh चा अर्थ संख्या दर्शविण्यास सांगितला आहे. तर Lac म्हणजे डिक्शनरीमध्ये कीटकांपासून काढलेला चिकट पदार्थ, जो वार्निशिंग, डाई आणि सीलिंग वॅक्स बनवण्यासाठी वापरला जातो.
काय आहे योग्य स्पेलिंग
Lakh किंवा Lac लिहिण्याबाबत रिझर्व्ह बँकेनं सामान्य ग्राहकांसाठी कोणतीही मार्गदर्शक तत्त्वं जारी केलेली नाहीत. मात्र याबाबत बँकांसाठी स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे आहेत. इंग्रजीत १ लाख हा आकडा दाखवण्यासाठी Lakh हा शब्द वापरावा, असं रिझर्व्ह बँकेच्या मास्टर सर्क्युलरमध्ये लिहिलं आहे. याचा अर्थ बँकिंगच्या अधिकृत भाषेत Lakh हा योग्य शब्द मानला जाईल. रिझर्व्ह बँकेच्या वेबसाइटवरही Lakh असाच वापर केला जात आहे.
चेक रिजेक्ट होणार का
भारतात बोली भाषेत दोन्ही शब्दांचा वापर होत असल्यामुळे चेक वर लिहिलेली दोन्ही स्पेलिंग्स चालून जातात. रिझर्व्ह बँकेकडून सर्वसामान्यांसाठी कोणतीही मार्गदर्शक तत्त्वे नसल्यामुळे बँका स्पेलिंगकडे फारसे लक्ष देत नाहीत. म्हणून, तुम्ही तुमच्या चेकवर दोन स्पेलिंगपैकी एक लिहून चेक जारी करू शकता. यापैकी कोणतंही स्पेलिंग लिहिलं तरी तुमचा चेक बाऊन्स होणार नाही किंवा रिजेक्ट होणार नाही.