Join us

LIC Housing Finance : एलआयसी हाउसिंग फायनॅन्सकडून होम लोन घेतलंय?; खिशावर येणार ताण, ईएमआय वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2022 8:06 PM

LIC Housing Finance : रेपो दरातील बदलामुळे ईएमआय अथवा टेन्योअरमध्ये होणार बदल.

LIC Housing Finance : जर तुम्ही एलआयसी हाउसिंग फायनान्सकडून लोन घेतले असेल तर आता जास्त ईएमआयचा ताण तुमच्या खिशावर पडणार आहे. एलआयसी हाऊसिंगने आपला प्राइम लेंडिंग रेट 50 बेसिस पॉइंट्सने वाढवला आहे. हा दर सोमवार, 22 ऑगस्टपासून लागू करण्यात आलाय. यापूर्वी रिझर्व्ह बँकेने रेपो दरात 50 बेसिस पॉईंट्सची वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता एलआयसी हाउसिंग फायनॅन्सने हा निर्णय घेतलाय. प्राईम लेंडिंग रेटशी निगडीत गृहकर्जासाठी EMI आता वाढणार आहे.

"आरबीआयचा 5 ऑगस्ट रोजी रेपो दरात 50 बेस पॉइंट्सने वाढ करण्याचा निर्णय विचार करायला लावणारा आणि जागतिक आर्थिक ट्रेंडच्या अनुषंगाने होता. रेपो रेट वाढल्याने, EMI किंवा टेन्योरमध्ये थोडासा बदल होणार आहे,” अशी प्रतिक्रिया एलआयसी हाउसिंग फायनान्सचे एमडी आणि सीईओ वाय विश्वनाथा गौड यांनी दिली. एएनआयनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. एलआयसी हाउसिंगच्या होमलोनसाठी आता नवीन व्याजदर 8 टक्क्यांपासून सुरू होतील. यापूर्वी ते 7.50 टक्के होते.

सिबिलनुसार ठरणार व्याजदर

वेबसाइटनुसार, एलआयसी हाउसिंग 8.05 टक्के दराने 50 लाख रुपयांपर्यंतचे होमलोन आणि 50 लाख ते 2 कोटी रुपयांपर्यंतचे होमलोन 8.25 टक्के दराने देते. हा व्याजदर त्या पगारदार आणि व्यावसायिकांसाठी आहे ज्यांचा CIBIL स्कोअर 700 किंवा त्याहून अधिक आहे.

600-699 दरम्यान क्रेडिट स्कोअर असलेल्यांसाठी 50 लाख रुपयांपर्यंतच्या होमलोनसाठी 8.30 टक्के आणि 50 लाख ते 2 कोटी रुपयांपर्यंतच्या होमलोनसाठी ८.५० टक्के व्याजदर आहे. 600 पेक्षा कमी क्रेडिट स्कोअर असलेल्यांसाठी 50 लाख रुपयांपर्यंतच्या होमलोनसाठी 8.75 टक्के आणि 50 लाख ते 2 कोटी रुपयांपर्यंतच्या होमलोनसाठी 8.95 टक्के व्याजदर आकारला जाणार आहे.

टॅग्स :सुंदर गृहनियोजनभारतीय रिझर्व्ह बँक