जर आपण लोनच्या वाढलेल्या ईएमआयमुळे त्रासलेला असाल, तर येणाऱ्या काही दिवसांत आपला त्रास आणखी वाढण्याची शक्यता आहे. येणाऱ्या काही दिवासंत आपल्याला आपल्या ईएमआयमध्ये आणखी पैसे टाकावे लागू शकतात. कारण RBI पुन्हा एकदा रेपो दरात वाढ करण्याची शक्यता आहे. गेल्या काही महिन्यांत, RBI ने रेपो रेट 2.5 टक्क्यांनी वाढविला आहे. यासह रेपोदर 6.50 टक्क्यांवर पोहोचला आहे.
याच आठवड्यात अमेरिकेतील रोजगाराचे आकडे (US Employment Data) जारी होणार आहेत. याच बरोबर महागाईचे आकडेही येतील. तज्ज्ञांच्या मते, हे आकडे फेडला व्याजदरात आक्रमकपणे वाढ करण्यास प्रवृत्त करू शकतात. असे झाल्यास, भारतातही रेपो रेटमध्ये वाढ होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर वाढेल.
जगातील दिग्गज फायनान्स कंपनी यूबीएस (UBS)च्या मते, भारतीय कंपन्या आधीच नफ्यातील कमतरतेचा सामना करत आहेत. व्याजदर चढे राहिल्यास यांना मोठा फटका बसेल. याच बरोबर, इक्विटी आणि बाँड बाजारासाठी पुढील दोन आठवडे महत्वाचे राहणार आहेत. आज अमेरिकेची केंद्रीय बँक फेडरल रिझर्वचे चेअरमन जेरोम पॉवेल कॅपिटल हिलवर आपल्या सहामाही चलनविषयक धोरणासंदर्भात माहिती देतील. यानंतर, 10 मार्चला अमेरिकेत फेब्रुवारी महिन्याची जॉब्स रिपोर्ट जारी होईल. यानंतर, 14 मार्चला महागाईचे आकडे येतील.
व्याजदरांसंदर्भात निर्णय 22 मार्चला -
यानंतर, 22 मार्चला यूएस फेड आपल्या पॉलिसी डिसीजन आणि तिमाही व्याज दरासंदर्भातील अनुमानांसंदर्भात घोषणा करेल. काही तज्ज्ञ विश्लेषक फेडकडून व्याजदरात 0.50 टक्क्यांची वाढ करण्यात येऊ शकते असा अंदाज वर्तवत आहेत. यापूर्वी व्याजदरात 0.25 टक्के वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला जात होता.
यूएसबीने म्हटले आहे, 'आमच्या मते भारतीय इक्विटीमध्ये व्हॅल्यूएशनवर घसरणीचा धोका आहे. व्याज दरातील वाढ अथवा ती अधिक राहिल्यास देशांतर्गत गुंतवणुकीत मिळणारे सहकार्य कमकुवत होईल. देशांतर्गत चलनवाढ 6 टक्क्यांवर राहिल्यास भारतीय रिझर्व्ह बँकदेखील व्याज दर वाढविण्यासंदर्भात आक्रमक राहू शकते.