एचडीएफसी लिमिटेड आणि एचडीएफसीबँक यांचं अलीकडेच विलिनीकरण झालं. या विलीनीकरणानंतर, एचडीएफसी (HDFC) ही भारतातील दुसरी सर्वात मोठी आणि जगातील चौथी सर्वात मोठी बँक बनली आहे. त्यानंतर आता आणखी एक मोठं विलिनीकरण होणार आहे. हे विलीनीकरण आयडीएफसी (IDFC) आणि आयडीएफसी फर्स्ट बँकेचं आहे.
इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फायनान्स कंपनीला (IDFC) भारतीय स्पर्धा आयोगाकडून (CCI) आयडीएफसी फर्स्ट बँकेत विलीन करण्याची मंजुरी मिळाली आहे. दरम्यान, या विलीनीकरणाला बोर्ड ऑफ इन्व्हेस्टर्सकडून आधीच मंजुरी मिळाली आहे. तथापि, सेबी, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलकडून (NCLT)मंजुरी मिळाल्यानंतरच हे विलीनीकरण प्रभावी होणार आहे.
असं गुणोत्तर निश्चित
जुलैमध्ये बँकेच्या संचालक मंडळानं IDFC आणि IDFC फायनान्शियल होल्डिंगच्या विलीनीकरणाला मंजुरी दिली होती. या विलीनीकरणाचं प्रमाण १५५:१०० असे निश्चित करण्यात आले आहे. आयडीएफसीच्या प्रत्येक १०० शेअर्समागे तुम्हाला आयडीएफसी फर्स्ट बँकेचे (IDFC First Bank) १५५ शेअर्स मिळतील. आयडीएफसी फर्स्ट बँकेच्या मते, विलीनीकरणामुळे आयडीएफसी, एफएचसीएल, आयडीएफसी लिमिटेड आणि आयडीएफसी फर्स्ट बँक यांना एका युनिटमध्ये कन्सोलिडेट करून कामकाज सुलभ केलं जाईल.
व्याप्ती वाढवण्यास मदत
हे इतर मोठ्या खाजगी क्षेत्रातील बँकांप्रमाणे प्रवर्तक हिस्स्याशिवाय विविध सार्वजनिक आणि संस्थात्मक भागधारकांसह संस्था तयार करण्यात मदत करेल. या विलीनीकरणामुळे बँकेला स्वत:ची व्याप्ती वाढवणं आणि मजबूत करणं सोपं होणार आहे. या वर्षी मार्च अखेरीस आयडीएफसी फर्स्ट बँकेची एकूण मालमत्ता २.४ लाख कोटी रुपये होती. कंपनीचा टर्नओव्हर २७,१९४.५१ कोटी रुपये होता. बँकेला २४३७.१३ कोटी रुपयांचा नफा झालाय.
IDFC चं IDFC फर्स्ट बँकेत होणार विलिनीकरण; कोणाला होणार फायदा, का होतं मर्जर
एचडीएफसीच्या विलिनीकरणानंतर आता आयडीएफसी आणि आयडीएफसी फर्स्ट बँकेचं विलीनीकरण होणार आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2023 01:32 PM2023-10-19T13:32:49+5:302023-10-19T13:33:34+5:30