Join us  

YES Bank च्या खरेदीसाठी जपानी बँकेचा 'नो', पाहा आता कोण-कोण आहे या शर्यतीत?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2024 10:38 AM

Yes Bank Deal : देशातील आघाडीच्या खासगी बँकांपैकी एक असलेल्या येस बँकेला (YES Bank) विकत घेण्याच्या शर्यतीत आता दोनच दावेदार आहेत. जाणून घ्या नक्की काय आहे प्रकरण?

Yes Bank Deal : देशातील आघाडीच्या खासगी बँकांपैकी एक असलेल्या येस बँकेला (YES Bank) विकत घेण्याच्या शर्यतीत आता दोनच दावेदार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जपानची आर्थिक कंपनी मिझुहो येस बँकेतील महत्त्वपूर्ण हिस्सा खरेदी करण्याच्या शर्यतीतून बाहेर पडण्याची योजना आखत आहे. त्यानंतर ही बँक विकत घेण्याच्या शर्यतीत फक्त सुमितोमो मित्सुई बँकिंग कॉर्पोरेशन (SMBC) आणि एमिरेट्स एनबीडी शिल्लक आहेत. मालमत्तेच्या बाबतीत येस बँक देशातील सहाव्या क्रमांकाची खासगी बँक आहे. बँकेची मार्केट व्हॅल्यू ७३,०२०.६७ कोटी रुपये आहे. ५१ टक्के हिस्सा विकल्यानंतर बँकिंग क्षेत्रातील हे देशातील सर्वात मोठे विलीनीकरण आणि अधिग्रहण असेल.

स्टेट बँक सर्वात मोठी शेअरहोल्डर

येस बँकेत स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) २३.९९ टक्के हिस्सेदारीसह सर्वात मोठी भागधारक आहे. याशिवाय एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, कोटक महिंद्रा बँक, अॅक्सिस बँक आणि एलआयसी यांचा यात एकूण ११.३४ टक्के हिस्सा आहे. जूनपर्यंत अॅडव्हेंट इंटरनॅशनल आणि कार्लाइल या दोन खासगी इक्विटी फंडांचा बँकेत अनुक्रमे ६.९४ टक्के आणि ९.२० टक्के हिस्सा होता. एसबीआयनं येस बँकेतील आपला हिस्सा विकत असल्याच्या वृत्ताचं खंडन केलंय. 

आम्ही तर्क-वितर्कांवर आधारित प्रश्नांवर भाष्य करणार नाही, असं येस बँकेच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केलं. तर दुसरीकडे एसएमबीसीनं प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. मिझुहोच्या भारताचे प्रतिनिधी आणि अबू धाबीतील एमिरेट्स एनबीडीच्या प्रवक्त्यांनीही प्रश्नांची उत्तरं दिली नाहीत. इकॉनॉमिक टाईम्सनं यासंदर्भातील वृत्त दिलंय.

का घेतली जपानी बँकेनं माघार?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मिझुहोला बँकेत आर्थिक गुंतवणूक करायची होती आणि बोर्डाचे प्रतिनिधित्व न करता बँकेतील २० ते २४ टक्के हिस्सा खरेदी करायचा होता. बँकेतील अतिरिक्त २६ टक्के हिस्सा खरेदी करण्यासाठी त्यांना कोणतीही खुली ऑफर द्यायची नव्हती. जपानकडून आर्थिक क्षेत्रात थेट परकीय गुंतवणुकीचे (FDI) अनेक प्रकल्प रखडले आहेत. कदाचित याच कारणामुळे मिझुहोच्या व्यवस्थापनानं त्यापासून दूर राहणं योग्य वाटल्याची शक्यता आहे.

जपानची सर्वात मोठी वित्तीय संस्था बँक ऑफ टोक्यो-मित्सुबिशी यूएफजे (MUFG) आणि एचडीएफसी बँक यांच्यात एचडीबी फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये सुमारे दोन अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीसाठी चर्चा रखडली आहे. एचडीबी फायनान्शियल सर्व्हिसेस आपला आयपीओ लाँच करण्याच्या तयारीत आहे. एमयूएफजीला देखील येस बँकेच्या प्रक्रियेसाठी सामील करण्यात आलं होतं, परंतु सुरुवातीच्या चर्चांनंतर त्यांनी माघार घेतली.

टॅग्स :येस बँकजपानस्टेट बँक आॅफ इंडिया