Mukesh Ambani Jio Financial Loan: मुकेश अंबानी यांच्या जिओ फायनान्शिअलनं एक नवी सुविधा सुरू केली आहे. तुम्ही तुमच्या डीमॅट खात्यात ठेवलेले शेअर्स आणि म्युच्युअल फंड तारण ठेऊन कर्ज घेऊ शकता. ही सुविधा ग्राहकांन जिओ फायनान्शिअल अॅपवर मिळणारे. ही प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल असेल, असं कंपनीचं म्हणणं आहे. अवघ्या १० मिनिटांत कंपनीकडून कर्ज मिळेल. ९.९९ टक्क्यांपासून पुढे याचा व्याजदर सुरू होणार असून तुम्ही १ कोटी रुपयांपर्यंत कर्ज घेऊ शकता. त्याची परतफेड करण्यासाठी तुम्हाला तीन वर्षांचा कालावधी मिळेल. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे मुदतीपूर्वी रक्कम फेडल्यास कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही. जिओ फायनान्स ही जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडची नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी (NBFC) आहे.
जिओ फायनान्स लिमिटेडनेही आता कर्ज देण्याच्या व्यवसायात एन्ट्री केली आहे. ही कंपनी आता लोकांना त्यांच्या सिक्युरिटीजवर कर्ज देणार आहे. म्हणजेच तुमच्याकडे शेअर्स किंवा म्युच्युअल फंड असतील तर ते तारण ठेवून तुम्ही सहज कर्ज घेऊ शकता.
शेअर्स आणि म्युच्युअल फंडांवर कर्ज
कंपनीने मंगळवारी एक निवेदन जारी केले. ग्राहक त्यांच्या डीमॅट खात्यावर कर्ज घेऊ शकतात आणि शेअर्स आणि म्युच्युअल फंडांसारख्या गुंतवणुकीचे तारण ठेवू शकतात. डिमॅट खाते एक प्रकारचे बँक खाते आहे ज्यामध्ये आपले शेअर्स आणि म्युच्युअल फंड ठेवले जातात.
जिओ फायनान्सच्या म्हणण्यानुसार कर्ज घेण्याची प्रक्रिया अतिशय सोपी आणि सुरक्षित आहे. ही प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल आहे. त्यामुळे कुठेही जाण्याची गरज नाही. जिओ फायनान्स अॅपच्या माध्यमातून तुम्ही घरबसल्या कर्जासाठी अर्ज करू शकता. ग्राहकांना केवळ १० मिनिटात कर्ज मिळेल, असा दावा कंपनीनं केलाय.
व्याजदर ९.९९ टक्क्यांपासून
कर्जावरील व्याजदर ९.९९ टक्क्यांपासून सुरू होईल. हा दर आपल्या जोखीम प्रोफाइलनुसार बदलू शकतो. जर तुम्ही हाय रिस्क कस्टमर असाल तर तुम्हाला जास्त व्याज द्यावं लागेल. जर तुम्ही कमी जोखमीचे ग्राहक असाल तर तुम्हाला कमी व्याज द्यावं लागेल. या सुविधेच्या माध्यमातून तुम्ही १ कोटी रुपयांपर्यंत कर्ज घेऊ शकता. कर्जाची परतफेड करण्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त तीन वर्षांचा कालावधी मिळेल. जर तुम्ही वेळेपूर्वी कर्जाची परतफेड केली तर तुम्हाला कोणतेही अतिरिक्त शुल्क भरावं लागणार नाही. यामुळे आपल्याला पैसे वाचविण्यास मदत होऊ शकते.
जिओ फायनान्सचे हे नवं फीचर ज्यांना अचानक पैशांची गरज भासते त्यांच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतं. याद्वारे सहजपणे कर्ज घेता येऊ शकतं आणि त्यांचे शेअर्स, म्युच्युअल फंड गहाण ठेवून त्यांच्या गरजा पूर्ण करू शकतात.