Join us  

Home Loans देण्याच्या तयारीत मुकेश अंबानींची 'ही' कंपनी, पाहा काय आहे प्लान?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2024 1:11 PM

Mukesh Ambani Jio Financial Services : होमलोन सेवा सुरू करण्याचं काम अंतिम टप्प्यात असून याची चाचणी म्हणून सुरुवात करण्यात आली असल्याचं कंपनीनं स्पष्ट केलंय.

मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांची कंपनी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसची (Jio Financial Services) नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी (NBFC) जिओ फायनान्स लिमिटेडनं मोठी घोषणा केली आहे. वास्तविक, होमलोन सेवा सुरू करण्याचं काम अंतिम टप्प्यात असल्याचं कंपनीनं सांगितलं. याची चाचणी (बीटा) म्हणून सुरुवात करण्यात आली आहे. याशिवाय कंपनी लोन अगेन्स्ट असेट्स, लोन अगेन्स्ट सिक्युरिटी अशी इतर उत्पादनंही ऑफर करणार आहे.

काय म्हणाले कंपनीचे सीईओ?

कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी हितेश सेठिया यांनी शुक्रवारी वार्षिक सर्वसाधारण सभेत भागधारकांना संबोधित करताना यासंदर्भातील माहिती दिली. "आम्ही होमलोन सुरू करण्याच्या अंतिम टप्प्यात आहोत, सध्या प्रायोगिक तत्त्वावर याची सुरुवात करण्यात आलीये. जिओ फायनान्स लिमिटेडनं यापूर्वीच सप्लाय चेन फायनान्सिंग, म्युच्युअल फंडांवर कर्ज आणि इक्विपमेंट्स फायनान्सिंगसारखी सुरक्षित कर्ज उत्पादनं बाजारात आणली आहेत," असं ते म्हणाले.

कंपनीच्या शेअरची स्थिती 

जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसच्या शेअरबद्दल बोलायचं झालं तर तो ३२१.७५ रुपयांवर आहे. शुक्रवारी हा शेअर १.२१ टक्क्यांनी घसरून बंद झाला. एप्रिल २०२४ मध्ये या शेअरनं ३९४.७० रुपयांचा उच्चांक गाठला होता. शेअरचा हा ५२ आठवड्यांचा उच्चांकी स्तर आहे. तर ऑक्टोबर २०२३ मध्ये शेअरची किंमत २०४.६५ रुपये होती. शेअरची ही ५२ आठवड्यांतील नीचांकी पातळी आहे.

(टीप : यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :रिलायन्समुकेश अंबानी