Join us  

क्रेडिट-डेबिट कार्डाबाबत निष्काळजीपणा; 'या' दिग्गज बँकेवर RBI ची मोठी कारवाई, काय परिणाम होणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2024 11:03 AM

RBI on HSBC Bank : पाहा कोणत्या बँकेला ठोठावला आरबीआयनं दंड, काय आहे कारण?

RBI on HSBC Bank : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं (RBI) हाँगकाँग आणि शांघाय बँकिंग कॉर्पोरेशन लिमिटेडला (HSBC) कार्डशी संबंधित काही निर्देशांचं पालन न केल्याबद्दल २९.६ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. रिझर्व्ह बँकेनं जारी केलेल्या पत्रकात म्हटले यासंदर्भातील माहिती दिलीये. बँकांच्या क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि को-ब्रँडेड प्रीपेड कार्ड व्यवहारांबाबत आरबीआयनं जारी केलेल्या काही निर्देशांचे पालन न केल्याबद्दल एचएसबीसीला दंड ठोठावण्यात आला असल्याचं रिझर्व्ह बँकेनं म्हटलंय.

नोटीस बजावण्यात आली होती

आरबीआयनं दिलेल्या माहितीनुसार बँकेनं ३१ मार्च २०२२ रोजी आपल्या आर्थिक स्थितीच्या संदर्भात पर्यवेक्षी मूल्यांकनासाठी वैधानिक तपास (आयएसई २०२२) केला होता. यावेळी आरबीआयच्या सूचनांचं पालन होत नसल्याचं निदर्शनास आलं. त्यासंदर्भातील संबंधित पत्रव्यवहाराच्या आधारे बँकेला नोटीस बजावण्यात आली. रिझर्व्ह कारण देण्यास सांगितलं होतं आणि या निर्देशांचे पालन करण्यात अपयशी ठरल्याबद्दल दंड का आकारला जाऊ नये, अशी विचारणा केली होती.

आरबीआय समाधानी नाही

आरबीआयने म्हटलं की, नोटीसला बँकेनं दिलेलं उत्तर, वैयक्तिक उपस्थितीदरम्यान दिलेली तोंडी उत्तरं आणि अतिरिक्त माहिती विचारात घेतल्यानंतर असं आढळले की, बँकेवरील आरोप सिद्ध झाले आहेत. ज्यामुळे आर्थिक दंड आकारण्याची आवश्यकता आहे. 'काही क्रेडिट कार्ड खात्यांमध्ये देय असलेल्या किमान देयकाची गणना करताना निगेटिव्ह अमोर्टायझेशन होणार नाही याची खात्री करण्यात बँक अपयशी ठरली,' असं निवेदनात म्हटलंय.

ग्राहकांवर परिणाम होणार नाही

मात्र, हा दंड वैधानिक आणि नियामक अनुपालनातील त्रुटींवर आधारित असल्याचं रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे. बँकेनं आपल्या ग्राहकांशी केलेल्या कोणत्याही व्यवहाराची किंवा करारा प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा याचा हेतू नाही. शिवाय, बँकेला आर्थिक दंड आकारल्यानं त्यांच्या पुढील कामकाजावर कोणताही विपरीत परिणाम होणार नसल्याचं आरबीआयनं म्हटलंय.

टॅग्स :भारतीय रिझर्व्ह बँक