स्टेट बँक ऑफ इंडियानं (SBI) ग्राहकांना त्यांच्या घरापर्यंत बँकिंग सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पावलं उचलली आहेत. या अंतर्गत, बँकेनं आपल्या ग्राहकांसाठी कमी वजनाची उपकरणं सादर केली, ज्याद्वारे ग्राहकांना विविध बँकिंग सेवांचा लाभ घेता येईल. एसबीआयचे अध्यक्ष दिनेश खारा यांनी यासंदर्भातील माहिती दिली. या उपक्रमाचा उद्देश आर्थिक समावेश मजबूत करणं आणि सामान्य लोकांना आवश्यक बँकिंग सेवा प्रदान करणे हा आहे. हा उपक्रम बँक सेवांचा लाभ घेण्यासाठी सुलभता आणि सुविधा वाढवण्याचा एक भाग आहे. हे पाऊल ‘किओस्क बँकिंग’ थेट ग्राहकांच्या घरापर्यंत आणत असल्याचे ते म्हणाले.
कोणाला मिळणार सुविधा?
हे ग्राहक सेवा केंद्र (CSP) एजंटना त्यांना ग्राहकांपर्यंत पोहोचण्यास मदत करेल, विशेषत: जे आरोग्यासंबंधित समस्यांना तोंड देत आहेत, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींना या सेवेचा लाभ घेता येईल.
कोणत्या सुविधा मिळणार?
नवीन उपक्रमांतर्गत, सुरुवातीला पाच प्रमुख बँकिंग सेवा – पैसे काढणं, जमा करणं, मनी ट्रान्सफर, बँक खात्यातील पैशांची माहिती घेणं आणि मिनी स्टेटमेंट उपलब्ध करून दिले जातील, अशी माहिती खारा यांनी दिली. बँकेच्या सीएसपीवरील एकूण व्यवहारांपैकी ७५ टक्क्यांहून अधिक वाटा या सेवांचा आहे. बँक नंतर सामाजिक सुरक्षा योजनांतर्गत नॉमिनेशन, खाते उघडणे आणि कार्ड-आधारित सेवा सुरू करण्याचा विचार करत असल्याचंही खारा यांनी स्पष्ट केलं.
SBI नं सुरू केली नवी सुविधा, लाखो ग्राहकांना होणार फायदा; दारात मिळणार बँकिंग सुविधा
स्टेट बँक ऑफ इंडियानं ग्राहकांना त्यांच्या घरापर्यंत बँकिंग सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पावलं उचलली आहेत.
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2023 10:34 AM2023-10-05T10:34:44+5:302023-10-05T10:36:09+5:30