New India Bank Case: फेब्रुवारी महिन्यात मुंबईतील न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेतील तब्बल १२२ कोटींचा घोटाळा उजेडात आला होता. या धक्क्यातून बँक ठेवीदार अजूनही सावरले नाहीत. साधा क्लर्क ते जनरल मॅनेजर पदापर्यंत पोहचलेल्या हितेश मेहताने बँकेला १२२ कोटी रुपयांना गंडा घातला आहे. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने मुख्य आरोपी हितेश मेहताला अटक केली आहे. मात्र, त्यानंतर ठेवीदारांची चिंता कमी झालेली नाही. त्यांनी भारतीय रिझर्व्ह बँकेकडे एक मागणी केली आहे.
ठेवीदारांची आरबीआयला विनंतीघोटाळा उघडकीस आल्यानंतर आरबीआयने बँकेच्या आर्थिक व्यवहार करण्यावर बंदी घातली आहे. त्यामुळे लाखो ठेवीदारांचे पैसे बँकेत अडकून पडले आहेत. या पार्श्वभूमीवर आरबीआयने पुढाकार घेऊन बँकेला यातून बाहेर काढावे, अशी विनंती ठेवीदारांच्या संघटनेने केली आहे.
RBI ने बँकेवर लादले निर्बंधरिझर्व्ह बँकेने बँकेवर अनेक निर्बंध लादले होते. यामध्ये बँकेतील घडामोडींमुळे उद्भवलेल्या पर्यवेक्षी चिंतेचा हवाला देऊन आणि ठेवीदारांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी ठेवीदारांचे पैसे परत करण्याचा समावेश होता. तसेच सहकारी बँकेचे संचालक मंडळ बरखास्त केलं असून कारभारासाठी प्रशासक नेमण्यात आला आहे.
२०२० ते २०२५ झाला घोटाळा२०२० ते २०२५ या कालावधीत हा गैरव्यवहार झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. बँकेच्या एका अधिकाऱ्याने आर्थिक गुन्हे शाखेला माहिती दिली की बँकेच्या खात्याच्या वह्या आणि रोख रकमेत अनियमितता आढळून आली आहे. दादर आणि गोरेगाव शाखेतून अनियमितपणे पैसे काढल्याचे तपासात उघड झाले असून, त्यामागे हितेश मेहताचा हात असल्याचे सांगण्यात आले आहे.
कसा केला घोटाळाआरोपी माजी जनरल मॅनेजर हितेश मेहता हा दोन शाखांचा प्रमुख होता. त्यामुळे बँकेतील तिजोरी त्याच्याच ताब्यात होती. तो बँकेतून पैसे काढून बाहेर नातेवाईक आणि व्यावसायिकांना वाटत असल्याचे तपासून समोर आले आहे. कोणाला संशय येऊ नये म्हणून तो रटिस्टरवर याची नियमित नोंद करत होता. जर आरबीआयने रोख नोटा मोजल्या नसत्या तर हा घोटाळा कधीच बाहेर येऊ शकला नसता.