Join us  

व्याजदरांबाबत RBI एमपीसी समितीत एकमत नाही? काही सदस्य रेपो रेट वाढवण्याच्या बाजूनं नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2023 10:20 AM

आरबीआयच्या पतधोरण समितीनं एप्रिल आणि जूनमध्ये झालेल्या समितीच्या बैठकीत रेपो दरात कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला होता.

RBI MPC Meeting Minutes: आरबीआयच्या पतधोरण समितीनं एप्रिल आणि जूनमध्ये झालेल्या समितीच्या बैठकीत रेपो दरात कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु आगामी काळात धोरणात्मक दर वाढवण्याबाबत सहा सदस्यीय एमपीसी समितीच्या सदस्यांमध्ये मतांची विभागणी झाल्याचं दिसून आलंय. ६-८ जून रोजी झालेल्या पतधोरण समितीच्या बैठकीच्या रिझर्व्ह बँकेनं जारी केलेल्या मिनिट्समधून ही माहिती समोर आली आहे. 

८ जून रोजी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी रेपो दरांची घोषणा केली. यावेळी त्यांनी यात कोणतेही बदल करण्यात आले नसल्याचं म्हटलं. परंतु महागाईचा सामना करण्यासाठी रिझर्व्ह बँक धोरणांचा कठोररित्या अवलंब करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. परंतु रिझर्व्ह बँकेचे एमपीसीचे एक्स्टर्नल सदस्य जयंत वर्मा यांनी यांपूर्वी वाढत्या रेपो दरावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. तसंच यावेळी त्यांनी पतधोरण समितीची भूमिका वास्तवाच्या पलिकडे असल्याचं त्यांनी बैठकीत दिलेल्या निवेदनात म्हटलं. मॉनिटरी पॉलिशी अशा पातळीवर पोहोचली आहे, जिकडे ती अर्थव्यवस्थेला मोठं नुकसानही पोहोचवू शकते, असं त्यांनी म्हटलं होतं.

दरम्यान, पतधोरण समितीच्या दुसऱ्या सदस्या आशिमा गोयल यांनी महागाई कमी होण्याची अपेक्षा असल्याचं म्हटलंय. परंतु रेपो दरात अधिक वाढ होऊ नये असंही त्यांनी सांगितलंय. रेपो दर अधिक काळासाठी जास्त ठेवण्याची गरज नाही. यामुळे अर्थव्यवस्थेला नुकसान पोहोचू शकतं, असंही त्यांनी नमूद केलं. 

रिझर्व्ह बँकेच्या आपल्या सदस्यांचं एमपीसी बैठकांमध्ये व्याजदराबाबत म्हणणं निराळं होतं. त्यांचं मत महागाईमुळे निर्माण होणाऱ्या आव्हानांवर असणार आहे. दरम्यान, यापूर्वी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी महागाईविरोधातील आपली लढाई संपली नसल्याचं म्हटलं. 

टॅग्स :भारतीय रिझर्व्ह बँकशक्तिकांत दास