एटीएममधून पैसे काढण्यासाठी आता डेबिट कार्डची गरज नाही. देशातील पहिलं व्हाईट लेव्हल युपीआय-एटीएम (UPI-ATM) लाँच करण्यात आलंय. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या (NPCI) सहकार्यानं हिताची पेमेंट सर्व्हिसेसनं हे एटीएम लाँच केलंय. याद्वारे ग्राहक डेबिट किंवा क्रेडिट कार्डशिवाय युपीआयद्वारे रोख रक्कम काढू शकतात. काही दिवसांपूर्वीच रिझर्व्ह बँकेनं युपीआयद्वारे रोख पैसे काढण्याच्या सुविधेबद्दल माहिती देणारे परिपत्रक जारी केले होते. सर्व बँका, एटीएम नेटवर्क, एटीएम ऑपरेटर्सनी त्यांच्या एटीएममध्ये इंटरऑपरेबल कार्डलेस कॅश काढण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, असं या परिपत्रकात म्हटलं होतं.
अशा परिस्थितीत, हिताचीने ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये युपीआय एटीएम लाँच करत पैसे काढण्याचा नवा मार्ग सादर केला. कंपनी भारतातील पहिलं युपीआय एटीएम लाँच करत आहे जे व्हाईट लेबल एटीएमचा प्रकार असेल. नॉन-बँकिंग सर्व्हिस प्रोव्हायडरच्या मालकीच्या, देखरेखीच्या आणि ऑपरेट केलेल्या एटीएम मशीन्सना व्हाईट लेबल एटीएम म्हणतात, अशी माहिती यावेळी हिताचीचे एमडी आणि सीईओ सुमिल विकमसे यांनी दिली.
कसं काम करतं?एटीएममधून पैसे काढण्यासाठी किती रक्कम हवी ते निवडा. निवडलेल्या रकमेशी संबंधित युपीआय क्युआर कोड दाखवला जाईल. ते स्कॅन करण्यासाठी तुमचं युपीआय अॅप वापरा. व्यवहाराची पुष्टी करण्यासाठी तुमचा युपीआय पिन एंटर करा. त्यानंतर तुम्हाला तुम्ही एन्टर केलेली रक्कम मिळेल. तुमच्या स्मार्टफोनमध्ये कोणतेही युपीआय सक्षम अॅप असल्यास तुम्ही हे करू शकाल.