लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : डेबिट कार्डसोबत आता तुमचे क्रेडिट कार्ड देखील यूपीआयशी लिंक केले जाऊ शकते. त्यामुळे व्यवहार अधिक सुलभ होणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी ग्लोबल फिनटेक फेस्टिव्हलमध्ये यूपीआय नेटवर्कवर रुपे क्रेडिट कार्डचे अनावरण केले. आत्तापर्यंत, फक्त डेबिट कार्ड आणि खाती यूपीआय नेटवर्कशी जोडली जाऊ शकत होती. आता पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक ऑफ इंडिया आणि इंडियन बँक या तीन बँकांनी ही सुविधा दिली आहे.
किती शुल्क भरावे लागेल? पंजाब नॅशनल बँकेचे सीईओ अतुल कुमार गोयल यांनी म्हटले की, यूपीआयशी क्रेडिट कार्ड लिंक करून यूपीआय पेमेंट करण्यासाठी कोणतेही एमडीआर आकारले जाणार नाही. मात्र, एक लहान इंटरचेंज शुल्क आकारले जाईल. हे किती असेल याची माहिती अद्याप देण्यात आलेली नाही. जे लोक गरजेच्या वेळी क्रेडिट कार्डमधून पैसे काढतात किंवा त्यातून बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करतात त्यांच्यासाठी हे सोपे होईल. या दोन्ही परिस्थितीत लोकांना अतिरिक्त शुल्क आणि कर भरावा लागतो.
असे होईल पेमेंटक्रेडिट कार्ड यूपीआयशी लिंक केल्यानंतर थेट क्यूआर कोड स्कॅन करून पेमेंट केले जाऊ शकते. पेमेंट करताना, कोणत्या क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डवरून पेमेंट करायचे आहे, असा पर्याय मिळेल. तुम्ही यूपीआय ॲपवरून पेमेंट सुरू करताच, तुमच्या नोंदणीकृत मोबाइलवर एक ओटीपी येईल. ओटीपी सबमिट केल्यावर पेमेंट पूर्ण होईल.
२०० रुपये पाठवण्यासाठी...आरबीआयने यूपीआय लाइट सेवा देखील सुरू केली आहे. यात ग्राहक इंटरनेटशिवाय पेमेंट करू शकतील. यूपीआय लाइटच्या माध्यमातून २०० रुपयांपर्यंतची रक्कम ट्रान्सफर केली जाऊ शकते.
रुपे क्रेडिट कार्ड देणाऱ्या बँकाभारतीय स्टेट बँक (एसबीआय) । पंजाब नॅशनल बँक । बँक ॲाफ बडोदा । आयडीबीआय बँक । युनियन बँक ॲाफ इंडिया । सारस्वत बँक । फेडरल बँक
यूपीआय ॲपशी असे लिंक करा क्रेडिट कार्ड सर्व प्रथम यूपीआय पेमेंट ॲप उघडा. प्रोफाइल पिक्चरवर क्लिक करा. पेमेंट सेटिंग्ज पर्यायावर जा. ॲड क्रेडिट/डेबिट कार्ड पर्याय निवडा. कार्ड क्रमांक, सीव्हीव्ही, कार्ड धारकाचे नाव इत्यादी माहिती भरा. सर्व तपशील टाकल्यानंतर सेव्ह बटणावर क्लिक करा.
याचा फायदा नेमका कुणाला?
nएनपीसीआय म्हणजेच नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने म्हटले की, याचा ग्राहक आणि व्यापारी या दोघांनाही फायदा होईल. ग्राहकांसाठी संधीचे नवीन दरवाजे उघडले आहेत आणि व्यापाऱ्याला अधिक वापराचा लाभ मिळेल.