भारतातील आघाडीची डिजिटल पेमेंट सर्व्हिस 'फोन पे'नं (PhonePe) नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. भारतानं अलीकडेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत UPI पेमेंटचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला होता. आता फोनपे नं दुबईमध्ये आपला व्यवसाय वाढवला आहे. आता तुम्ही संयुक्त अरब अमिरातीमध्ये सहज युपीआय पेमेंट करू शकाल. या संदर्भात, 'फोन पे'नं दुबईची आघाडीची बँक Mashreq सोबत भागीदारी केली आहे. जर तुम्ही आता दुबईला जाणार असाल तर जास्त काळजी करण्याची गरज नाही, तिकडेही तुम्हाला ऑनलाइन पेमेंट करता येणार आहे.
'फोन पे'चे इंटरनेट पेमेंट सीईओ रितेश राय यांनी यावर प्रतिक्रिया दिली. या भागीदारीमुळे ग्राहक परदेशात सहज पेमेंट करू शकतील. आजकाल बरेच लोक दुबईला भेट देत आहेत, आता त्यांना यामुळे पेमेंट करणं सोपं होणार आहे. यासाठी NEOPAY टर्मिनलचा वापर करण्यात आलाय. दुबईमधील अनेक किरकोळ दुकानांमध्ये NEOPAY उपलब्ध आहे. मनोरंजनाच्या ठिकाणांसह अनेक खास ठिकाणी तुम्हाला हा पेमेंट मोड दिसत असल्याचे ते म्हणाले.
कसं करू शकता पेमेंट?
पेमेंट करण्यासाठी तुम्हाला वेगळं काहीही करण्याची गरज नाही. तुम्हाला साधा QR कोड स्कॅन करून रक्कम भरावी लागेल. एकदा तुम्ही पेमेंट केल्यानंतर तुम्हाला काहीही करावं लागणार नाही. कारण तुमच्या खात्यातून पैसे रुपयांमध्ये कापले जातील, पण त्या ठिकाणी ते स्थानिक करन्सीमध्ये दिसतील. तुम्हाला त्या ठिकाणी एक्सचेंज रेट देखील दिसेल. स्टेटमेंटमध्येही हे तुम्हाला दिसून येईल.
जे वापरकर्ते NRI आहेत आणि युएईचा मोबाईल नंबर वापरत आहेत त्यांनाही या सेवेचा लाभ घेता येणार आहे. ते वापरण्यासाठी, त्यांना PhonePe ॲप डाउनलोड करावे लागेल आणि ते त्यांचं खातं त्याच्याशी जोडू शकतील.