UPI Tap And Pay: डिजिटल इंडियाच्या या युगात, आपण आजकाल बहुतांश लहान-मोठी पेमेंट्स युनिफाइड पेमेंट इंटरफेसद्वारे (UPI) करतो. दहा रुपयांचा चहा प्यायल्यानंतरही आपण त्या ठिकाणी असलेला क्युआर कोड स्कॅन करतो आणि UPI अॅपद्वारे त्याचे पैसे देखील देतो. कधीकधी अशा लहान पेमेंट्स दरम्यान, युपीआय अॅप उघडणं आणि नंतर पिन टाकणं थोडं कठीण वाटतं. परंतु आता काळजी करण्याची गरज नाही, अशा प्रकारची पेमेंट्स अधिक सुलभ होणार आहेत. लवकरच युपीआयचं असं फीचर लाँच होणार आहे, ज्याद्वारे अगदी काही सेकंदात तुमचं पेमेंट होईल. या फीचरला टॅप अँड पे असं नाव देण्यात आलंय.
टॅप आणि पे फीचरद्वारे, तुम्ही फक्त तुमचा फोन टॅप करून कोणतंही छोटं पेमेंट करू शकता. म्हणजेच, जर तुम्हाला चहाच्या स्टॉलवर पेमेंट करायचं असेल, तर तुम्हाला अॅप उघडण्याची किंवा पासवर्ड टाकण्याची गरज नाही, तुम्हाला फक्त तुमचा फोन स्कॅनरसमोर घ्यावा लागेल आणि पेमेंट होईल. तुम्ही तुमच्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डनं मशिनवर टॅप करून पेमेंट करता त्याच पद्धतीने हे काम करेल.
केव्हा होणार लाँच?नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं (NPCI) UPI टॅप अँड पे लाँच करण्याची तयारी सुरू केली आहे. असं सांगण्यात येतंय की हे फीचर ३१ जानेवारी २०२४ पर्यंत लॉन्च केलं जाऊ शकतं. सध्या, पेटीएम, भीम अॅप आणि Google Pay सारख्या काही UPI अॅप्सवर निवडक युझर्सना ही सुविधा दिली जात आहे. हे फीचर वापरण्यासाठी युजर्सच्या मोबाईलमध्ये नियर फील्ड कम्युनिकेशन (NFC) तंत्रज्ञान असणं आवश्यक आहे.किती असेल लिमिट?तुम्ही UPI Lite किंवा टॅप आणि पे फीचरद्वारे मोठी पेमेंट्स करू शकणार नाही. जर तुम्हाला ५०० रुपयांपेक्षा जास्त पैसे द्यायचे असतील तर तुम्हाला तुमचा युपीआय पिन टाकावा लागेल. टॅप आणि पे फीचरसह तुम्ही फक्त ५०० रुपयांपर्यंत पेमेंट करू शकता. म्हणजेच, किराणा दुकान, स्टॉल्स किंवा तत्सम छोट्या गरजांसाठीचं अवघ्या काही सेकंदात या सेवेद्वारे करता येईल.