Join us  

आता विना इंटरनेटही करू शकता पेमेंट, 'या' सरकारी बँकेनं सुरु केली खास सेवा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2023 3:31 PM

आता इंटरनेटशिवाय कोणत्याही साध्या मोबाइलद्वारे तुम्ही या सेवेचा लाभ घेऊ शकता.

गेल्या काही महिन्यांपासून ऑनलाइन पेमेंटमध्ये सातत्यानं वाढ होत आहे. अनेक ठिकाणी आता ऑनलाइन पेमेंट घेतलं जातं. त्यामुळे आता बँकाही आपल्या ग्राहकांसाठी नव्या सुविधा घेऊन येत आहेत. तुमचं जर पंजाब नॅशनल बँकेत खातं असेल तर तुम्ही पीएनबीच्या IVR-आधारित युपीआय प्रणालीचाही लाभ घेऊ शकता. याद्वारे तुम्ही इंटरनेट कनेक्टिव्हिटीशिवाय पेमेंट करू शकाल. कारण पंजाब नॅशनल बँकेने डिजिटल पेमेंट करण्यासाठी IVR-आधारित UPI प्रणाली सुरू केली आहे. यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार पेमेंट प्रक्रियेत कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.

पंजाब नॅशनल बँकेनं महत्त्वाचं पाऊल उचललं असून आयव्हीआर आधारित युपीआय सेवा सुरु केली आहे. ही सेवा देणारी पंजाब नॅशनल बँक ही पहिली सरकारी बँक ठरलीये. याद्वारे ग्राहकांना फीचर फोनच्या माध्यमातून डिजिटल पेमेंट करता येईल.

पंजाब नॅशनल बँकेच्या ग्राहक वर्गाचा एक महत्त्वपूर्ण भाग ग्रामीण आणि लहान शहरांमध्ये राहतो. त्यामुळे सुमारे ६३ टक्के शाखा या भागात आहेत. यामुळेच या भागात या उपक्रमाचे महत्त्व वाढल्याचं बँकेच्या सीईओंनी सांगितलं. याशिवाय या ठिकाणी राहणाऱ्या बहुतेक व्यक्ती अजूनही त्यांचा बहुतांश व्यवहार रोखीनं करत असल्याचा दावाही करत UPI 123pay सेवेमुळे या भागात पेमेंट सिस्टममध्ये परिवर्तन घडून येऊ शकतं असंही ते म्हणाले.

कसा कराल वापरयुपीआय 123Pay चा लाभ घेण्यासाठी, ग्राहकांना त्यांच्या फोनवरून आयव्हीआर नंबर 9188-123-123 डायल करणं आवश्यक आहे. प्रॉम्प्ट दिल्यानंतर ते लाभार्थ्याची निवड करू शकतात आणि आपला व्यवहार करू शकतात. ही सेवा सर्व भाषांमध्ये उपलब्ध आहे. याद्वारे कोणत्याही बँकेतील ग्राहकांना पेसे पाठवता येऊ शकतात. विना इंटरनेट कनेक्टिव्हीटी या सेवेचा लाभ घेता येऊ शकतो.

टॅग्स :पंजाब नॅशनल बँकपैसा