एका सेक्टरने चीनची अवघी अर्थव्यवस्था हादरवून सोडली आहे. आता हे सेक्टर अन्य क्षेत्रांना गिळंकृत करायला लागले आहे. रिअल इस्टेट सेक्टरने आता बँका आणि उद्योगांच्या तोंडांना फेस आणण्यास सुरुवात केली आहे. जगातील दुसरी अर्थव्यवस्था म्हटल्या जाणाऱ्या चीनला कोरोनाने संपविण्यास सुरुवात केली आहे.
कोरोनामध्ये लॉकडाऊनचे कठोर नियम लादल्याने चीनला घरघर लागली आहे. परदेशी कंपन्या चीनकडे पाठ फिरवत आहेत. रिअल इस्टेटला संकटाचा सामना करावा लागत आहे. जगातील सर्वात मोठी कंपनी एव्हरग्रँड बुडाली आहे. यामुळे रेटिंग एजन्सी जेपी मॉर्गनच्या मते, चीनच्या बँका मोठ्या संकटाचा सामना करत आहेत.
जेपी मॉर्गनच्या मते, 2024 सालापर्यंत चिनी बँकांच्या कमाईत 10 टक्क्यांनी घट होऊ शकते. रिअल इस्टेट कंपन्या आणि विकासकांकडून कर्जाची परतफेड होत नसल्याने बँकांची बुडीत कर्जे वाढत चालली आहेत. 2023 च्या पहिल्या सहामाहीत चीनी बँकांचे नॉन-परफॉर्मिंग लोन रेशो म्हणजेच NPA 4.5 टक्क्यांवरून 7.5 टक्क्यांपर्यंत वाढले आहे. तो १३ टक्क्यांपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे.
घरे विकली जात नसल्यामुळे कर्जाची परतफेडही कंपन्यांना अशक्य झाली आहे. याचा मोठा परिणाम चिनी बँकांवर होत आहे. कमी डाउन पेमेंट ते व्याजदर कमी करण्यापर्यंतच्या ऑफर्स दिल्या जात आहेत. चीन सरकारच्या या प्रयत्नांना खरेदीदार भीक घालत नाहीएत. मोठमोठ्या कंपन्या चीनबाहेर जाऊ लागल्या आहेत. यामुळे या लोकानी पैसे वाचविण्याकडे कल दिला आहे. रिअल इस्टेट कंपन्यांनी बांधलेल्या टोलेजंग इमारती ओस पडलेल्या आहेत. यामुळे बँकांनाही नवीन ग्राहक मिळत नाहीय. रिअल इस्टेट कंपन्या कर्जबाजारी झाल्यामुळे दिवाळखोरीत जात आहेत.
चीनच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीचा अंदाजही चुकत चालला आहे. 2023 मध्ये त्याचा विकास दर 5 टक्के असू शकतो. ब्लूमबर्गने आता 2023 चा चीनचा आर्थिक विकास दर 4.90 टक्क्यांवर आणला आहे. चीनचा विकास दर ५ टक्क्यांच्या खाली पोहोचला आहे.