Join us

Credit Card नं पेमेंट केलं, पैसे कापले गेले अन् ट्रान्झॅक्शनही फेल झालं; असं झाल्यास काय करावं?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2024 1:53 PM

तुम्ही क्रेडिट कार्ड द्वारे पेमेंट करता आणि काही वेळा ट्रान्झॅक्शन फेल होतं, पण तुमचे पैसे कापले गेल्याचा मेसेज येतो. यावेळी नक्की काय करायचं जाणून घ्या.

अतिरिक्त खर्चाला मॅनेज करण्यासाठी किंवा कोणत्याही मोठ्या खरेदीसाठी क्रेडिट कार्ड खूप उपयुक्त ठरतं. जरी, आता लहान खर्च भागविण्यासाठी क्रेडिट कार्डचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो, परंतु क्रेडिट कार्ड व्यवहार काही कारणास्तव फेलही होतात. अशा परिस्थितीत, असं होईल की तुम्ही खरेदी करत आहात, तुम्ही पैसेही भरले असतील, तुमचे पैसे कापले गेल्याचा मेसेजही तुम्हाला आला असेल. असं असलं तरी तुम्हाला तुमचं ट्रान्झॅक्शन फेल झाल्याचा मेसेज आलाय. आता अशा परिस्थितीत काय करायचं? असा प्रश्नही पडेल. यासाठी आपण त्वरित काही पावलं उचलली पाहिजेत. 

पैसे कापले गेले का नाही? 

पैसे प्रत्यक्षात कापले गेले आहेत की नाही हे तुम्ही आधी तपासलं पाहिजे. तुमच्या मोबाइल ॲप किंवा ऑनलाइन बँकिंगद्वारे तुमचं क्रेडिट कार्ड स्टेटमेंट तपासा. त्यात फेल ट्रान्झॅक्शनचे तपशील आहेत की नाही ते पाहा. जर तुम्हाला पैसे कापले गेल्याचं दिसलं तर डिटेल्स नोट करुन ठेवा. त्यामध्ये व्यवहाराची तारीख, रक्कम आणि मर्चंटचं नाव असेल. 

मर्चंटशी संपर्क करा 

पैसे कापले गेल्याची पुष्टी केल्यानंतर, मर्चंटशी संपर्क साधा. यासाठी तुम्हाला त्यांच्या कस्टमर सपोर्ट किंवा हेल्प डेस्कवर कॉल करावा लागेल. त्यांना एकंदरीत स्थितीची माहिती द्या. तुम्हाला व्यवहाराची संपूर्ण माहिती द्यावी लागेल. याद्वारे ते अधिक तपशीलांसह रेकॉर्ड तपासण्यास सक्षम असतील. जर त्यांच्याकडून काही त्रुटींमुळे, तुमचे पैसे कापले गेले असतील, परंतु ट्रान्झॅक्शन झालं नसेल, तर ते तुम्हाला परतावा किंवा पुन्हा सर्व्हिस प्रोव्हाईड करण्याचा पर्याय देऊ शकतात. 

सर्व रेकॉर्ड ठेवा 

ट्रान्झॅक्शन फेल झाल्यापासून ते त्यानंतरपर्यंत तुम्ही करत असलेल्या प्रत्येक गोष्टीची नोंद ठेवा. तुम्ही बँकेत किंवा व्यापाऱ्याशी कोणाशीही बोलले असल्यास, ईमेल, चॅट लॉग किंवा फोन कॉल रेकॉर्ड यासारख्या सर्व गोष्टींची नोंद ठेवा. पैसे कापले गेल्याचं जे स्टेटमेंट डिटेल आहे त्याची कॉपी तुमच्याकडे ठेवा, आवश्यक असल्यास ते नंतर पुरावा म्हणून वापरता येऊ शकतं. 

डिस्प्यूट क्लेम फाईल करा 

मर्चंटशीही बोलूनही तोडगा निघाला नाही, तर तुम्हाला या व्यवहारावर डिस्प्यूट क्लेम दाखल करावा लागेल. यासाठी तुमच्या बँकेच्या ग्राहक सेवेशी संपर्क साधा आणि क्लेम दाखल करा. सर्व पुरावे, व्यवहाराचा तपशील आणि कम्युनिकेशन रेकॉर्ड अटॅच करा. त्यानंतर बँक चौकशी सुरू करेल. तुम्ही थेट बँकेत जाऊन कोणाशीही समोरासमोर बोलू शकता. 

फॉलोअप घ्या 

डिस्प्यूट दाखल केल्यानंतर, तुमच्या बँकेकडून वेळोवेळी अपडेट्स घेत राहा. यासाठी वेळ लागू शकतो, परंतु प्रकरण अडकणार नाही याची खात्री करण्यासाठी चौकशी करत राहा.

टॅग्स :बँकपैसा