Join us

UPI मार्केटमध्ये Paytmचं वर्चस्व झपाट्यानं झालं कमी, कसा असेल भविष्यातील ट्रेंड

By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2024 3:29 PM

रिझर्व्ह बँकेच्या कारवाईमुळे पेटीएमच्या यूपीआय व्यवसायाला मोठा फटका बसला आहे.

Paytm Crisis: रिझर्व्ह बँकेच्या कारवाईमुळे पेटीएमच्या (Paytm) यूपीआय व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. जानेवारीमध्ये UPI मार्केटमध्ये त्यांचा हिस्सा ११.८ टक्के होता आणि आता तो फेब्रुवारीमध्ये ११ टक्क्यांवर आला आहे. आरबीआयने ३१ जानेवारी रोजी पेटीएम पेमेंट्स बँकेवर कारवाई केली होती.  

गेल्या वर्षी, यूपीआय मार्केटमध्ये त्यांचा हिस्सा १३.३ टक्के होता, जो नऊ महिन्यांत हळूहळू कमी होऊन ११ टक्के झाला, परंतु आरबीआयच्या कारवाईमुळे या घसरणीचा वेग वाढला. विशेष गोष्ट अशी आहे की आरबीआयच्या कारवाईचा यूपीआय व्यवसायावर थेट परिणाम होत नसतानाही केवळ एका महिन्यात इतकी मोठी घसरण झाली आहे. मनीकंट्रोलनं बँकिंग सूत्रांच्या हवाल्यानं यासंदर्भातील माहिती दिली आहे. 

Google Pay चा हिस्सा वाढतोय 

युपीआय प्लॅटफॉर्म चालवणाऱ्या नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या (NPCI)साइटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, पेटीएमचा एप्रिल २०२३ मध्ये UPI मार्केटमध्ये १३.३ टक्के वाटा होता, जो मे २०२३ मध्ये १३ टक्के आणि जून २०२३ मध्ये १२.८ टक्क्यांवर आला. नोव्हेंबर २०२३ मध्ये ते १२.१ टक्के आणि त्यानंतर जानेवारी २०२४ मध्ये ११.८ टक्क्यांवर आला. या काळात युपीआय मार्केटमध्ये Google Pay चा वाटा वाढला आहे. एप्रिल २०२३ मध्ये त्यांचा हिस्सा ३५ टक्के होता, जो जानेवारी २०२४ मध्ये ३६.४ टक्क्यांवर पोहोचला. या कालावधीत क्रेडचा वाटाही ०.५ टक्क्यांवरून ०.९ टक्क्यांपर्यंत वाढला आहे.

टॅग्स :पे-टीएमगुगल पे