HDFC Bank MCLR Hike : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी आवाहन करुनही भारतीय रिझर्व्ह बँकेने कर्जदारांना कुठलाही दिलासा दिला नाही. आरबीआयच्या चलनविषयक धोरण समितीची बैठक नुकतीच पार पडली, जी धोरणात्मक व्याजदरांवर म्हणजेच रेपो दरावर निर्णय घेते. यामध्ये ११व्यांदा रेपो दरात कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेण्यात आला. रेपो रेट हा तो दर आहे, ज्यावर RBI देशातील बँकांना कर्ज देते. आरबीआयने रेपो दरात कोणताही बदल केला नाही. पण देशातील सर्वात मोठी खासगी बँक HDFC बँकेने गुपचूप कर्ज महाग केलं आहे.
एचडीएफसी बँकेने मार्जिन कॉस्ट ऑफ फंड्स बेस्ड लेंडिंग रेट (MCLR) मध्ये ५ बेस पॉईंट्स म्हणजेच काही कालावधीसाठी ०.०५ टक्के वाढ केली आहे. हा MCLR दर केवळ एका रात्रीच्या कालावधीसाठी वाढवण्यात आला आहे. पूर्वी तो ९.१५ टक्के होता, तो वाढवून ९.२० टक्के करण्यात आला आहे. उर्वरित कालावधीसाठी MCLR वाढविण्यात आलेला नाही. नवीन MCLR दर ७ डिसेंबर २०२४ पासून लागू झाले आहेत.
नवीन MCLR दर
ओव्हरनाइट - ९.१५ टक्क्यांवरून ९.२० टक्क्यांपर्यंत वाढले
एक महिना - ९.२० टक्के (बदल नाही)
तीन महिने- MCLR ९.३० टक्के (बदल नाही)
सहा महिने- MCLR ९.४५ टक्के (बदल नाही)
एक वर्ष – MCLR ९.४५ टक्के (बदल नाही)
२ वर्षांपेक्षा जास्त कालावधी - ९.४५ टक्के (बदल नाही)
३ वर्षांपेक्षा जास्त कालावधी - ९.५० टक्के (बदल नाही)
MCLR कसा ठरवला जातो?
एमसीएलआर ठरवताना अनेक बाबी विचारात घेतल्या जातात ज्यात ठेव दर, रेपो दर, ऑपरेशनल खर्च आणि रोख राखीव प्रमाण राखण्याची किंमत यांचा समावेश होतो. साधारणपणे रेपो दरातील बदल MCLR दरावर परिणाम करतात. MCLR मधील बदल कर्जाच्या व्याजदरावर परिणाम करतात, ज्यामुळे कर्जदारांचा EMI वाढतो.
कर्जाचा EMI वाढणार
MCLR मधील वाढीचा परिणाम गृहकर्ज, वाहन कर्ज, वैयक्तिक कर्जासह संबंधित सर्व प्रकारच्या कर्जाच्या व्याजदरांवर दिसून येईल. जुन्या ग्राहकांना पूर्वीपेक्षा जास्त ईएमआय भरावा लागेल. नवीन कर्ज घेणाऱ्या ग्राहकांसाठी कर्ज महाग होईल.