personal finance : घर घेतल्यानंतर प्रत्येक मध्यमवर्गीयाचं कार घेण्याचं स्वप्न असते. आता वाहन कर्ज सहज उपलब्ध होत असल्याने अनेकजण ते पूर्ण करण्यास सक्षम आहेत. थोडे डाउन पेमेंट आणि नंतर मासिक हप्ते यामुळे वाहन खरेदी करणे अगदी सोपे झाले आहे. मात्र, आर्थिक संकट सांगून येत नाही. अशा अनपेक्षित कारणांमुळे ग्राहकांना वेळेत ईएमआय भरता येत नाही. अशा परिस्थितीत कर्ज देणारी कंपनी एकदोन इशारे दिल्यानंतर वाहन जप्त करते. परंतु, काही पर्याय वापरुन तुम्ही हे घडण्यापासून रोखू शकता.
बँक किंवा फायनान्स कंपनीशी बोला
जर तुम्ही हप्ता भरू शकत नसाल तर लगेच तुमच्या कर्ज देणाऱ्याशी बोला. ते यावर नक्कीच काहीतरी पर्याय सुचवतील. ज्यामुळे तुमची कार जप्त होण्यापासून वाचू शकेल. या पर्यायांमध्ये कार्यकाळ वाढवणे आणि हप्त्याची रक्कम कमी करणे यासारख्या पद्धतींचा समावेश होतो.
पुनर्वित्त
जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही भविष्यात थोडे जास्त पैसे देऊ शकता. तर कार जप्त होण्याची परिस्थिती टाळता येऊ शकते. अशा परिस्थितीत तुम्ही पुनर्वित्तीकरणाची मदत घेऊ शकता. म्हणजेच तुम्ही टॉप-अप कर्जासाठी अर्ज करू शकता. तुमचा क्रेडिट स्कोर चांगला असेल तरच तुम्हाला हे कर्ज सहज मिळेल.
ईएमआय मुक्त कालावधी
हा पर्याय अपवादात्मक परिस्थितीत वापरता येतो. तुम्ही तुमच्या कर्जदाराला EMI मोफत कालावधीसाठी विनंती करू शकता. अनेक बँक किंवा फायनान्स कंपन्या तुमचा हप्ता ३ ते ६ महिन्यांसाठी थांबवू शकतात. त्यानंतर तुम्हाला पुन्हा नियमित EMI भरावे लागतील.
उपचारापेक्षा प्रतिबंधात्मक उपाय चांगला
उपचारापेक्षा प्रतिबंधात्मक उपाय हा वाक्प्रचार अनेक अर्थांनी चांगला आहे. वाईट परिस्थितीत अडकल्यानंतर उपाय शोधण्याऐवजी, आपण आधीच खबरदारी घेतली पाहिजे. जर तुम्हाला कर्जाचा हप्ता चुकवायचा नसेल तर त्यासाठी आधीच आर्थिक नियोजन करुन ठेवा. तुमचे खर्च अधिक चांगल्या पद्धतीने व्यवस्थापित करा. खूप जास्त रकमेचे कर्ज घेऊ नका किंवा आवश्यकतेपेक्षा कमी कालावधीसाठी जाऊ नका कारण यामुळे तुमचा हप्ता वाढेल.