Personal Loan : "हलो सर/मॅडम मी अमुक या बँकेतून बोलत आहे. आमच्या बँकेकडून तुमची निवड झाली असून तुम्हाला पर्सनल लोनची ऑफर देण्यात आली आहे." असे फोन कॉल्स तुम्हाला येत असतील ना? सध्या पर्सलन लोन घेण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मात्र, अनेकजण हे लोन सहज मिळतंय म्हणून कुठल्याही कारणासाठी घेताना पाहायला मिळत आहे. पर्सनल लोनला आपत्कालीन कर्ज असेही म्हणतात. कारण कठीण काळात जेव्हा तुम्हाला पैशाची खूप गरज असते तेव्हा तुम्हाला हे कर्ज सहज मिळते. यासाठी फारशी कागदपत्रे लागत नाहीत आणि खात्यात पैसे जमा होण्यास जास्त वेळही लागत नाही. हे कर्ज तुमचा सिबिल स्कोअर, उत्पन्न इत्यादीच्या आधारावर दिले जाते. यामध्ये कोणत्याही प्रकारची हमी देण्याची गरज नसते. तुम्ही वैयक्तिक कर्जाची रक्कम कुठेही वापरू शकता. परंतु, काही कारणांसाठी तुम्ही कधीही वैयक्तिक कर्ज घेऊ नका, अन्यथा तुम्ही मोठ्या संकटात सापडू शकता.
जर तुम्ही कुठणाकडून उधार किंवा उसने पैसे घेतले असतील तर वैयक्तिक कर्ज घेऊन ते परत करण्याची चूक करू नका. असे केल्याने तुम्ही उधारी नक्कीच चुकती कराल. मात्र, वैयक्तिक कर्जाच्या चक्रात अडकाल. अनेक वर्षे याचे हप्ते भरावे लागतील. जर तुम्ही हे कर्ज फेडण्यास सक्षम नसाल तर तुम्ही स्वतःसाठी खड्डा खणत असल्याचे समजा. अशा स्थितीत मनस्ताप करण्याशिवाय दुसरा पर्याय दिसत नाही.
शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करणारे अनेकजण ही चूक करतात. मोठा नफा मिळवण्यासाठी वैयक्तिक कर्ज काढून शेअर बाजारात लावले जातात. मात्र, शेअर मार्केट खूप अनिश्चित आहे. यात रावाचा रंक व्हायला अवधी लागत नाही. अतिआत्मविश्वासाने उचललेले हे पाऊल तुमच्यासाठी मोठी समस्या निर्माण करू शकते. स्टॉक मार्केटमध्ये आधीच खूप धोका आहे, अशा परिस्थितीत तुम्ही वैयक्तिक कर्ज घेऊन आणखी एक मोठी चूक करता.
तुमची हौस किंवा छंद हे अनेकदा अनावश्यक खर्च करायला भाग पाडते. उदाहरणार्थ, समजा तुम्हाला तुमच्या छंदासाठी सोन्याचे दागिने किंवा अंगठी घ्यायची असेल किंवा एखादा महागडा मोबाईल घ्यायचा असेल तर हे छंद पूर्ण करण्यासाठी वैयक्तिक कर्जाचा सहारा घेऊ नका. घरातील बजेट लक्षात घेऊन आपले छंद पूर्ण करा. स्टेटसच्या नादात पर्सनल लोन घेण्याची चूक करू नका.
आजकाल पर्सनल लोन अगदी चुटकीसरशी मिळत आहे. या बदल्यात तुम्हाला कोणतीही मालमत्ता इत्यादी गहाण ठेवण्याची गरज नाही. गृहकर्ज, कार कर्ज, दुचाकी कर्ज इत्यादींसारखी बहुतांश कर्जे कर्जाच्या वापरावर निर्बंधांसह येतात. परंतु, वैयक्तिक कर्जासह असे कोणतेही निर्बंध नाहीत. तुमच्या इच्छेनुसार आणि गरजेनुसार तुम्ही ते कुठेही वापरू शकता. या सोयीमुळे पर्सनल लोन घेण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. मात्र, या कर्जचा व्याजदर हा तुलनेत जास्त आहे. त्यामुळे आपात्कालीन परिस्थितीतच अशी कर्ज घ्या असा सल्ला तज्ञांकडून दिला जातो.