Join us

पर्सनल लोन की ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी, दोन्ही पैकी तुमच्यासाठी अधिक फायदेशीर काय? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2024 2:03 PM

Personal Loan vs Overdraft: तुमच्या बचत खात्यात पैसे नसतील आणि तुम्हाला अचानक पैशांची गरज भासली तर, नाईलाजास्तव कर्ज घ्यावं लागतं. अशा परिस्थितीत, त्यांच्यासाठी पर्सनल लोन किंवा ओव्हरड्राफ्ट सुविधा घेणं हा एकमेव पर्याय आहे.

तुमच्या बचत खात्यात पैसे नसतील आणि तुम्हाला अचानक पैशांची गरज भासली तर, नाईलाजास्तव कर्ज घ्यावं लागतं. अनेकांना मित्र किंवा नातेवाईकांकडून पैसे उधार घेणं आवडत नाही. अशा परिस्थितीत, त्यांच्यासाठी पर्सनल लोन किंवा ओव्हरड्राफ्ट (OD) सुविधा घेणं हा एकमेव पर्याय आहे. प्रश्न असा आहे की दोघांपैकी काय तुमच्यासाठी फायदेशीर आहे? पर्सनल लोन काही नवीन नाही. तुम्ही बँक किंवा NBFC कडून पर्सनल लोन घेऊ शकता. त्याचा व्याजदर निश्चित आहे, जेणेकरून तुम्हाला तुमच्या ईएमआयबद्दल माहिती मिळते. दुसरीकडे, पैशाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ओव्हरड्राफ्ट सुविधा हा देखील एक सोपा पर्याय आहे. बँका ग्राहकांना ही सुविधा देतात. 

काय आहे ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी? 

जेव्हा बँक ग्राहकाला ओव्हरड्राफ्ट सुविधा देते, तेव्हा ती त्याला क्रेडिट लाइन ऑफर करते. त्याचा व्याजदर ठरलेला असतो. क्रेडिट लाइनवर मर्यादा आहे. या मर्यादेपर्यंत तुम्ही बँकेकडून निश्चित व्याजदरानं पैसे घेऊ शकता. दुसरीकडे, पर्सनल लोनमध्ये तुम्ही जितक्या पैशांसाठी अर्ज करता तितकेच बँक तुम्हाला देते. दोघांमधील सर्वात मोठा फरक हा आहे की ओव्हरड्राफ्ट सुविधेत तुम्ही एकाच वेळी किंवा अनेक वेळा कमाल मर्यादेपर्यंत पैसे काढू शकता. 

समजा तुमच्याकडे ५ लाख रुपयांपर्यंतची ओव्हरड्राफ्ट सुविधा आहे. तुमच्याकडे बँकेकडून ५ लाख रुपयांपर्यंत कर्ज म्हणून कोणतीही रक्कम घेण्याचा पर्याय आहे. तुम्ही १ लाख रुपये, ३ लाख रुपये किंवा १०,००० रुपये देखील घेऊ शकता. दुसरं म्हणजे, हे पैसे तुम्ही बँकेतून तुम्हाला हवे तेव्हा घेऊ शकता. पहिल्याच नजरेत तुम्हाला ओव्हरड्राफ्ट सुविधा आकर्षक वाटू शकते. पण दोघांमध्ये खूप फरक आहे. 

काय आहे फरक? 

पर्सनल लोनवरील व्याज दरमहा एकूण रकमेवर मोजलं जातं. जर तुम्ही ५ लाखांचं कर्ज घेतलं असेल तर एकूण व्याज ५ लाखांवर लागेल. ओव्हरड्राफ्टमध्ये, तुम्ही बँकेकडून घेतलेल्या रकमेवरच व्याज आकारलं जातं. तुम्ही जितक्या दिवसांसाठी बँकेत पैसे परत करत नाही तितक्या दिवसांसाठी देखील व्याज आकारलं जातं. तुम्ही ओव्हरड्राफ्ट सुविधेअंतर्गत बँकेकडून कोणतेही पैसे न घेतल्यास तुम्हाला कोणतंही व्याज द्यावं लागणार नाही. 

सामान्यपणे, ओव्हरड्राफ्ट सुविधेतील व्याज दर पर्सनल लोनपेक्षा जास्त असतो. परंतु, जर तो सिक्युअर्ड ओव्हरड्राफ्ट असेल तर व्याज दर खूपच कमी असू शकतो. सिक्युअर्ड ओव्हरड्राफ्ट म्हणजे ग्राहकानं बँकेतील फिक्स्ड डिपॉझिटवर या सुविधेचा लाभ घेतला आहे. 

पर्सनल लोनमध्ये, त्याची मुदत आधीच निश्चित केलेली असते. हे पैसे तुम्हाला किती दिवसात परत करायचे आहेत हे तुम्हाला माहीत आहे. ओव्हरड्राफ्ट सुविधेत असा कोणताही कालावधी नाही. तुम्ही तुमच्या गरजेनुसार बँकेकडून पैसे उधार घेऊ शकता आणि ते परत करू शकता. 

पर्सनल लोनच्या परतफेडीचा कालावधी ठरलेला असतो. तुमचा ईएमआय आधीच ठरलेला असतो. ओव्हरड्राफ्ट सुविधेतील परतफेड लवचिक आहे. ग्राहकाला हवे तेवढे पैसे परत करता येतात. तुम्ही बँकेकडून घेतलेल्या पैशावरच व्याज आकारलं जाते. 

काय आहे फायदेशीर? 

या प्रश्नाचं उत्तर प्रत्येक ग्राहकासाठी वेगळं असू शकते. परंतु, साधारणपणे ओव्हरड्राफ्ट सुविधा लवचिक मानली जाते. यामध्ये ग्राहकांच्या खात्यात पैसे लगेच ट्रान्सफर होतात. अल्प मुदतीच्या कर्जासाठी ओव्हर ड्राफ्ट फायदेशीर आहे. जर तुम्ही दीर्घ कालावधीसाठी कर्ज घेत असाल तर पर्सनल लोन घेणं फायदेशीर आहे. पण, दोन्ही कर्जाच्या श्रेणीत येतात. म्हणून, तुम्हाला कोणताही पर्याय वापरताना सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे.

टॅग्स :बँकपैसा