गेल्या काही काळात महागाईमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत रिझर्व्ह बँक (RBI Repo Rate) पुन्हा एकदा रेपो दरात वाढ करू शकते. यामुळे गृहकर्जासह सर्व प्रकारची कर्जे महाग होऊ शकतात. पण तुम्हाला स्वस्तात गृहकर्ज मिळवण्याची संधी आहे. एसबीआयकडून गृहकर्जावर सवलत मिळण्यासाठी आता फक्त तीन दिवस उरले आहेत. ग्राहकांना होमलोनवर अॅक्च्युअल कार्ड रेट पेक्षा ०.५५ टक्क्यांपर्यंतचा दिलासा मिळू शकतो.
यासोबतच प्रोसेसिंग फीमध्ये ५० ते १०० टक्के सूट दिली जात आहे. ही सूट रेग्युलर होम लोन, फ्लेक्सिपे, एनआरआय आणि नॉन-सॅलरी होम लोनवर दिली जात आहे. प्रोसेसिंग फी आणि गृह कर्जावरील सवलतीची अंतिम तारीख ३१ ऑगस्ट २०२३ आहे. एसबीआयच्या होम लोन वेबसाइटनुसार, सर्व एचएएल आणि टॉप अप व्हर्जनसाठी कार्ड रेटवर ५० टक्के ((०.३५ टक्क्यांच्या ५० टक्के) कर्जाच्या रकमेच्या पटीनं) सूट देण्यात येत आहे.
एसबीआय होम लोनच्या सर्व प्रकारांवर आणि टॉप अप्सच्या प्रोसेसिंग फीवर ५० टक्के सूट देत आहे. यासोबतच जीएसटीमध्येही सूट मिळणार आहे. टेकओव्हर, रिसेल आणि रेडी-टू-मूव्ह घरांसाठी गृहकर्जावर प्रोसेसिंग फीवर १०० टक्के सूट दिली जात आहे. परंतु इन्स्टा होम टॉप अप, रिव्हर्स मॉर्टगेज आणि ईएमडीसाठी प्रक्रिया शुल्काची कोणतीही सूट नाही.
व्याजदरात सूट
तुमचा सिबिल स्कोअर चांगला असल्यास गृहकर्जाच्या व्याजदरात सूट मिळू शकते. ७५० ते ८०० आणि त्यापेक्षा जास्त क्रेडिट स्कोअर असलेल्या व्यक्तींना गृहकर्जावर ०.४५ टक्के सूट दिली जात आहे. त्यांना ८.७० टक्के दरानं गृहकर्ज देण्यात येत आहे, तर सूट नसल्यास हा व्याजदर ९.१५ टक्के आहे. त्याचप्रमाणे, ७०० ते ७४९ क्रेडिट स्कोअर असलेल्या व्यक्तींना ०.५५ टक्के सूट दिली जात आहे. अशा लोकांसाठी, स्टेट बँक ८.८० टक्के दराने गृहकर्ज देत आहे. तर विना सवलत हा दर ९.३५ टक्के आहे. ज्या लोकांचा सिबिल स्कोअर ६५० ते ६९९ दरम्यान आहे त्यांना कोणतीही सूट मिळणार नाही. त्यांच्यासाठी व्याजदर ९.४५ टक्के आणि ५५० ते ६४९ सिबिल असलेल्यांसाठी व्याजदर ९.६५ टक्के आहे.