Join us  

PM Awas Yojana: कोण घेऊ शकतं या सरकारी स्कीमचा फायदा, कसं कराल अप्लाय? जाणून घ्या संपूर्ण माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2024 2:15 PM

PM Awas Yojana: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा तिसरा कार्यकाळ सुरू झाला आहे. सोमवारी मंत्रिमंडळाची पहिली बैठक पार पडली ज्यात शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या गरजांशी संबंधित निर्णय घेण्यात आले.

PM Awas Yojana: पंतप्रधाननरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा तिसरा कार्यकाळ सुरू झाला आहे. सोमवारी मंत्रिमंडळाची पहिली बैठक पार पडली ज्यात शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या गरजांशी संबंधित निर्णय घेण्यात आले. एकीकडे पीएम किसान सन्मान निधीचा १७ वा हप्ता जारी करण्यात आला, तर दुसरीकडे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत (पीएमएवाय) ३ कोटी घरे बांधण्याच्या योजनेला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. देशातील प्रत्येकाला पक्की घरे मिळावीत, या उद्देशानं पीएमएवायची सुरुवात करण्यात आली होती. या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो आणि अर्ज करण्याचा मार्ग काय आहे हे आज आपण जाणून घेऊ. 

काय आहे ही योजना?सरकारनं जून २०१५ मध्ये पीएम आवास योजनेची सुरूवात केली. ही योजना ग्रामीण आणि शहरी भागात चालवली जाते. ग्रामीण भारतात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण (पीएमएवाय-जी) आणि शहरी भारतात ती पंतप्रधान आवास योजना शहरी (पीएमएवाय-यू) म्हणून चालविली जाते. पीएम आवास योजनेअंतर्गत सरकार होम लोनवर सबसिडी देते.  

अनुदानाची रक्कम घराचा आकार आणि उत्पन्न यावर अवलंबून असते. या योजनेअंतर्गत बँकांना कमी व्याजदरात गृहकर्ज उपलब्ध करून देण्यासाठी प्रोत्साहन दिलं जातं. या योजनेअंतर्गत गृहकर्जाचा जास्तीत जास्त परतफेडीचा कालावधी २० वर्षांचा आहे. गेल्या १० वर्षांत पीएमएवाय अंतर्गत ४.१ कोटींहून अधिक घरं बांधण्यात आली आहेत. 

कोण घेऊ शकतो लाभ? 

ज्यांचं वार्षिक उत्पन्न १८ लाख रुपयांपर्यंत आहे ते या योजनेचा लाभ घेऊ शकतात. ईडब्ल्यूएसशी संबंधित लोक ज्यांचे वार्षिक उत्पन्न ३ लाख रुपयांपेक्षा कमी आहे, ते देखील या योजनेसाठी पात्र आहेत. योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचं वय १८ वर्षे असावं. तसंच ती व्यक्ती भारताचा नागरिक असणं आवश्यक आहे. तुमच्याकडे आधीच पक्कं घर नसेल तरच या योजनेचा लाभ घेता येईल, ही बाब लक्षात ठेवणं आवश्यक आहे. कुटुंबातील कुणाची सरकारी नोकरी असली तरी या योजनेचा लाभ घेता येत नाही. याशिवाय भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या कोणत्याही गृहनिर्माण योजनेचा लाभ घेणाऱ्या कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. 

कसा कराल अर्ज? 

या योजनेचा लाभ ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही प्रकारे घेता येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पंतप्रधान आवास योजनेच्या अधिकृत संकेतस्थळाला https://pmaymis.gov.in/ भेट द्यावी लागेल. याशिवाय ऑफलाइन अर्ज करण्यासाठी जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये जावं लागेल. अर्ज करताना ओळखपत्र, पत्त्याचा पुरावा, उत्पन्नाचा पुरावा, पासपोर्ट आकाराचा फोटो आणि मालमत्तेची कागदपत्रं अशी काही कागदपत्रेही आवश्यक असतील.

टॅग्स :नरेंद्र मोदीपंतप्रधानसरकार