Government Schemes: केंद्र सरकार देशातील प्रत्येक स्तरातील लोकांसाठी अनेक स्कीम्स सुरू करत असते. केंद्र सरकारनं उद्योगांसाठी, महिलांसाठी समाजातील अनेकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी अनेक स्कीम्स सुरू केल्या आहेत. दरम्यान, काही वर्षांपूर्वी केंद्र सरकारनं मुद्रा योजनेची सुरुवात केली होती. त्याअंतर्गत ३२ लाख कोटी रुपयांच्या कर्जाचं वाटप करण्यात आल्याची माहिती पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी दिली.
गुजरातमध्ये सुरत अन्न सुरक्षा अभियानाचा शुभारंभ केल्यानंतर उपस्थितांना त्यांनी संबोधित केलं. “आम्ही आतापर्यंत मुद्रा योजनेंतर्गत गरीब नागरिकांना ३२ लाख कोटी रुपयांचं कर्ज दिलं आहे. ज्यांच्याकडे शून्य जागा आहे, ते आमच्याबद्दल अपशब्द वापरतात. त्यांना ३२ कोटींमधील शून्यही मोजता येणार नाहीत,” असं म्हणत पंतप्रधानांनी विरोधकांवर टीकेचा बाण सोडला होता. दरम्यान, जाणून घेऊया काय आहे ही योजना.
काय आहे स्कीम?
पंतप्रधान मुद्रा कर्ज योजना पंतप्रधान मोदी यांनी २०१५ मध्ये सुरू केली होती. लोकांना स्वत:चा व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदत करणं हा या योजनेचा उद्देश आहे. या योजनेअंतर्गत लोक स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी १० लाखापर्यंत कर्ज घेऊ शकतात. या योजनेअंतर्गत हे कर्ज केवळ बिगर कॉर्पोरेट आणि बिगरशेती व्यवसायांसाठी दिलं जातं.
योजनेचे व्याजदर काय?
प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेअंतर्गत कर्जाचे व्याजदर अत्यंत कमी आहेत. हे व्याजदर ९ ते १२ टक्क्यांच्या दरम्यान आहेत. याशिवाय कर्जात अन्य कोणत्याही प्रकारचं शुल्क आकारलं जात नाही. हे कर्ज तीन प्रकारात दिले जाते. यामध्ये शिशु लोन, किशोर लोन आणि तरुण लोनचा समावेश आहे. शिशु लोन अंतर्गत तुम्ही ५०,००० रुपयांपर्यंत कर्ज घेऊ शकता. किशोर श्रेणीमध्ये तुम्ही ५ लाखांपर्यंत कर्ज घेऊ शकता. तर तरुण श्रेणीमध्ये तुम्ही २० लाखापर्यंत कर्ज घेऊ शकता.