PNB Loan Fraud : बँकांचे हजारो कोटी रुपयांचे कर्ज बुडवून परदेशात फरार झालेल्या आरोपींवर भारत सरकार सातत्याने पकड घट्ट करत आहे. याआधी सरकारने पंजाब नॅशनल बँकेला (पीएनबी) हजारो कोटी रुपयांचा गंडा घालणाऱ्या विजय मल्लाला सरकारने वठणीवर आणले आहे. मल्ल्याची भारतात असलेल्या बहुतेक संपत्तीचा लिलाव करण्यात आला आहे. यामध्ये त्यांचे बंगळुरू येथील अलिशान हवेलीचाही समावेश आहे. संपत्तीचा लिलाव झाल्यानंतर मल्ल्या आता न्यायाची भिक मागत आहे. अशीच कारवाई आता मेहुल चोक्सीवरही करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे.
मेहुल चोक्सीच्या मालमत्तेचा लिलाव होणार
बँकांनी यापूर्वीच विजय मल्ल्याकडून हजारो कोटी रुपये वसूल केले आहेत. आता मेहुल चोक्सीची मालमत्ता विकून ही रक्कम वसूल करण्याच्या तयारीत आहेत. न्यायालयानेही यासाठी बँकांना परवानगी दिली आहे. पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) कर्ज फसवणूक प्रकरणातील मुख्य आरोपी फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीची कंपनी गीतांजली जेम्स लिमिटेडच्या १३ मालमत्तांच्या लिलावाला मुंबईतील विशेष न्यायालयाने परवानगी दिली आहे.
विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एस.एम. मेंजोगे यांच्यासमोर प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग ॲक्ट (पीएमएलए) संबंधित खटल्यांची सुनावणी होत आहे. अधिकृत लिक्विडेटरची याचिका मान्य करताना मेंजोगे म्हणाले की, जर मालमत्ता देखरेखीशिवाय निष्क्रिय ठेवल्या तर त्याचे मूल्य नक्कीच कमी होईल.
कोणत्या मालमत्तांचा लिलाव होणार?
न्यायालयाने मंजुरी दिलेल्या मालमत्तेत मुंबईतील सांताक्रूझ येथील खेनी टॉवरमधील सात फ्लॅट, भारत डायमंड बोर्समधील एक व्यावसायिक युनिट, गुजरातमधील सुरत येथील डायमंड पार्कमधील चार कार्यालयीन युनिट आणि तेथील एका दुकानाचा समावेश आहे. न्यायालयाने सांगितले की मूल्यांकन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, अर्जदार लिक्विडेटरला गीतांजली जेम्स लिमिटेडच्या असुरक्षित मालमत्तेचा लिलाव करण्याची परवानगी आहे. हा लिलाव कायद्यानुसार केला जाणार असून यासाठी ईडी (अंमलबजावणी संचालनालय) मदत करणार आहे.
एफडी खात्यात रक्कम जमा केली जाईल
न्यायालयाने सांगितले की लिक्विडेटरला आयसीआयसीआय बँकेत मुदत ठेवी (FD) उघडण्याची परवानगी दिली जाईल. ही परवानगी जीजीएल कन्सोर्टियम आणि नक्षत्र वर्ल्ड लिमिटेड- एनडब्ल्यूएल कंसोर्टियमसाठी लीड बँक म्हणून देण्यात आली आहे. मालमत्ता विक्रीतून मिळालेल्या रकमेच्या संदर्भात ही परवानगी देण्यात आली आहे. विक्रीची रक्कम एफडीच्या स्वरूपात (विशेष न्यायालयाच्या बाजूने) सर्व संबंधित खर्च आणि मूल्यमापन/लिलावासाठी झालेला खर्च वजा करून जमा केली जाईल.
मेहुल चोक्सीवर काय आरोप आहेत?
अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दिलेल्या माहितीनुसार, अब्जाधीश नीरव मोदी आणि गीतांजली जेम्सचे प्रवर्तक असलेला त्याचा काका मेहुल चोक्सी या दोघांवर कोट्यवधींच्या फसवणुकीचा आरोप आहे. या दोघांवर १२,६३६ कोटी रुपयांच्या बनावट दाव्यांच्या आधारे भारतीय बँकांच्या विदेशी शाखांच्या नावे लेटर्स ऑफ अंडरटेकिंग (एलओयू) आणि फॉरेन लेटर्स ऑफ क्रेडिट (एफएलसी) मिळवल्याचा आरोप आहे. आता बँका त्यांची मालमत्ता विकून पैसे वसूल करत आहेत.