RBI New Deputy Governor Poonam Gupta Salary: केंद्र सरकारने बुधवारी नॅशनल कौन्सिल ऑफ अप्लाइड इकॉनॉमिक रिसर्च (NCAER) च्या महासंचालक पूनम गुप्ता यांची भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) च्या डेप्युटी गव्हर्नरपदी नियुक्ती केली. त्या एमडी पात्रा यांची जागा घेतील. पात्रांनी जानेवारीत आपले पद सोडले होते. मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने (ACC) गुप्ता यांच्या नियुक्तीला तीन वर्षांसाठी मान्यता दिली आहे.
कोण आहेत पूनम गुप्ता ?
पूनम गुप्ता यांनी दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून अर्थशास्त्रात पदव्युत्तर आणि अमेरिकेतील मेरीलँड विद्यापीठातून पीएचडी केली आहे. त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात अध्यापनापासून केली आणि दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, आयएसआय दिल्लीसह अनेक प्रतिष्ठित संस्थांमध्ये शिकवले. त्यानंतर IMF आणि World Bank मध्ये सामील झाल्या. तिथे सुमारे 20 वर्षे काम केल्यानंतर 2021 पासून त्या NCAER च्या महासंचालक म्हणून कार्यरत होत्या.
प्रमुख उपलब्धी आणि जबाबदाऱ्या
पूनम गुप्ता या पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या आणि 16व्या वित्त आयोगाच्या सल्लागार समितीच्या निमंत्रक होत्या. भारताच्या G20 अध्यक्षपदाच्या काळात त्यांनी मॅक्रोइकॉनॉमिक्स आणि ट्रेडवरील टास्क फोर्सचे अध्यक्षपद भूषवले. 1998 मध्ये त्यांना आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रावरील पीएचडीसाठी EXIM बँक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
आरबीआयसाठी त्या महत्त्वाच्या का आहेत?
पूनम गुप्ता यांची नियुक्ती आरबीआयसाठी महत्त्वाची मानली जात आहे. याचे कारण म्हणजे, पूनम गुप्ता यांना मॅक्रो इकॉनॉमिक्स, सेंट्रल बँकिंग आणि आर्थिक स्थिरता या क्षेत्रातील सखोल अनुभव आहे. त्यांचे कौशल्य RBI ला देशाची आर्थिक धोरणे मजबूत करण्यात मदत करेल. जागतिक आर्थिक आव्हानांच्या या युगात त्यांचा अनुभव आरबीआयसाठी खूप उपयुक्त ठरेल, असे तज्ज्ञांचे मत आहे.
पूनम गुप्ता यांचा पगार आणि सुविधा
रिपोर्ट्सनुसार, आरबीआयच्या नवीन डेप्युटी गव्हर्नर पूनम गुप्ता यांना दरमहा सुमारे 2,25,000 रुपये पगार मिळेल. याशिवाय अनेक प्रकारचे भत्ते मिळतात, ज्यात महागाई भत्ता, श्रेणी भत्ता, शिक्षण भत्ता, घरगुती भत्ता, टेलिफोन भत्ता, वैद्यकीय भत्ता इत्यादींचा समावेश होतो. यासोबतच त्यांना राहण्यासाठी एक छान मोठे घर दिले जाते.