public holiday in maharashtra : तुमची काही महत्त्वाची कामे सरकारी कार्यालयात किंवा बँकेत असतील तर पुढील २ दिवसांत पूर्ण करुन घ्या. कारण, महाराष्ट्र शासनाने २० नोव्हेंबर २०२४ हा दिवस संपूर्ण राज्यात सार्वजनिक सुट्टी म्हणून घोषित केला आहे. या दिवशी सर्व सरकारी कार्यालये आणि इतर संबंधित संस्थांव्यतिरिक्त बँकाही बंद राहतील. त्यामुळे या दिवशी बँकांमध्ये कोणतेही आर्थिक व्यवहार करता येणार नाहीत. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. अशा परिस्थितीत सर्वांना मतदान करण्यासाठी संधी मिळावी यासाठी सर्व सरकारी आणि खासगी कार्यालयांना सुट्टी देण्यात येणार आहे.
मोबाईल आणि नेट बँकिंग सुविधा सुरू राहणार
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या सचनेनुसार, २० नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात बँका बंद राहणार आहेत. अशा परिस्थितीत, ज्यांना त्यांच्या नियमित बँकिंग सेवा जसे की पैसे काढणे, जमा करणे किंवा चेक क्लिअरिंग करायचे आहे, त्यांनी 20 नोव्हेंबरपूर्वी किंवा नंतर करावे. मात्र, बँकेला सुट्टी असली तरी मोबाईल बँकिंग आणि नेट बँकिंग सुविधा सामान्यपणे सुरू राहतील. याचा अर्थ ग्राहक या डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे केव्हाही आणि कोठूनही आर्थिक व्यवहार करू शकतात.
सर्व कंपन्यांमध्ये सुट्टी अनिवार्य
मुंबईचे जिल्हा निवडणूक अधिकारी, भूषण गगराणी यांनी सांगितले आहे की, सर्व कंपन्यांना त्यांच्या कर्मचाऱ्यांना मतदानासाठी सुट्टी देणे अनिवार्य आहे. कोणत्याही कंपनीने हा नियम न पाळल्यास त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल. निवडणुकीदरम्यान कोणतीही व्यक्ती त्याच्या मतदानाच्या हक्कापासून वंचित राहू नये हा सुट्टीचा उद्देश आहे. दरम्यान, सर्व आपात्कालीन सेवा मात्र सुरू राहणार आहेत.
राज्यात २८८ विधानसभा जागांसाठी मतदान
राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघांसाठी एकाच दिवशी मतदान होणार आहे. महाराष्ट्रात २८८ विधानसभा मतदारसंघासाठी ४ हजार १४० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या निवडणुकीचं चित्र २३ नोव्हेंबर २०२४ रोजी स्पष्ट होणार आहे.