सरकारी बॅंक यूनियन बँक ऑफ इंडियानं आपल्या पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. वार्षिक आधारावर, चालू आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या जून तिमाहीत यूनियन बँकेच्या नफ्यात १३.६८% वाढ झाली आहे. तर निव्वळ व्याज उत्पन्न (NII) ६.४७ टक्क्यांनी वाढलंय. त्याच वेळी, एप्रिल-जून तिमाहीत बँकेच्या निव्वळ एनपीए आणि एकूण एनपीएमध्ये घट झाली आहे.
बँकेला किती नफा?
आर्थिक वर्ष २०२५च्या पहिल्या तिमाहीत, यूनियन बँकेचा नफा वार्षिक आधारावर ३,२६३ कोटी रुपयांवरून ३,६७९ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. तर एनआयआय म्हणजेच निव्वळ व्याज उत्पन्न ८,८४० कोटी रुपयांवरून ९,४१२ कोटी रुपयांवर पोहोचलंय. पहिल्या तिमाहीत कॅपिटल एडिक्वेसी रेश्यो १७.२ टक्के होता.
जून तिमाहीत, बँकेचा निव्वळ एनपीए वार्षिक आधारावर १.०३ टक्क्यांवरून ०.९० टक्क्यांवर घसरला. त्याच वेळी, ग्रॅास एनपीए ४.७६ टक्क्यांवरून ४.५४ टक्क्यांवर घसरला. तिमाही आधारावर, NIM ३.० टक्क्यांवरून ३.०५ टक्क्यांवर घसरला. दरम्यान, पहिल्या तिमाहीत बँकेची तरतूद वार्षिक आधारावर २,००५ कोटी रुपयांवरून २,७५६ कोटी रुपयांपर्यंत वाढली आहे.
डिपॅाझिटमध्येही वाढ
देशांतर्गत ठेवी वार्षिक आधारावर ८.५२ टक्क्यांनी वाढल्या असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. ३० जूनपर्यंत बँकेकडे एकूण ठेवी १२,२४,१९१ कोटी रुपये आहेत. बँकेच्या एकूण व्यवसायात वार्षिक आधारावर ९.७६ टक्क्यांनी वाढ झाली आहे, ज्यामध्ये ग्रॅास ॲडव्हान्समध्ये वार्षिक आधारावर ११.४६ टक्क्यांनी वाढ झाली आहे आणि एकूण ठेवी वार्षिक आधारावर ८.५२ टक्क्यांनी वाढल्या आहेत. २० जूनपर्यंत बँकेचा एकूण व्यवसाय २१,३६,४०५ कोटी रुपयांचा आहे.