Join us

भारतीय बँकांवर सायबर हल्ल्याचा धोका वाढला, RBI चा सर्व बँकांना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2024 1:35 PM

Cyber Risk on Banks: रिझर्व्ह बँकेने वाढत्या सायबर जोखमीबद्दल बँकांना सतर्क केले आहे.

Cyber Risk on Banks: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) सायबर हल्ल्यांच्या (Cyber Attack) वाढत्या धोक्याबाबत भारतीय बँकांना इशारा दिला आहे. येत्या काही दिवसांत काही भारतीय बँकांवर सायबर हल्ले वाढू शकतात, अशी भीती सेंट्रल बँकेने व्यक्त केली आहे. या अलर्टसोबतच रिझर्व्ह बँकेने बँकांना सायबर सुरक्षा सुधारण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सेंट्रल बँकेने काही बँकांना सायबर हल्ल्यांच्या वाढत्या जोखमांसाठी तयार राहण्यास सांगितले आहे. तसेच, धोका कमी करण्यासाठी सुरक्षा वाढवण्याचा सल्लाही दिला आहे. या इशाऱ्यासोबतच, रिझर्व्ह बँकेने बँकांना सायबर सुरक्षा सुधारण्यासाठी कोणत्या मुद्द्यांवर काम करणे आवश्यक आहे, हे देखील सांगितले आहे.

सेंट्रल बँकेने घेतला आढावा RBI ने अलीकडेच जोखीम हाताळण्यासाठी बँकांच्या तयारीचा आढावा घेतला आहे. यासाठी रिझर्व्ह बँकेकडून सायबर सिक्युरिटी आणि माहिती तंत्रज्ञान परीक्षा घेतली जाते, ज्याला CSight असेही म्हणतात. CSight मध्ये विविध बँकांची आपत्ती व्यवस्थापन तयारी, इंटरनेट आणि मोबाइल बँकिंग प्लॅटफॉर्मची क्षमता, फसवणूक शोधण्याची यंत्रणा इत्यादी तपासल्या जातात.

डिजिटल बँकिंगमुळे जोखीम वाढतेडिजिटल बँकिंग वाढल्याने सायबर हल्ल्यांचे धोकेही वाढले आहेत. यासाठी सायबर आणि आयटीचा स्वतंत्रपणे आढावा घेण्याची गरज आहे. CSight अंतर्गत RBI ची तपासणी पथके सर्व बँकांच्या IT प्रणालीची कसून तपासणी करतात. तपासादरम्यान, त्या गोष्टी ओळखल्या जातात, ज्यामुळे धोका निर्माण होऊ शकतो. त्यानंतर बँका कशा सुरक्षीत ठेवायच्या, याबाबत सल्ला दिला जातो.

यापूर्वीही इशारा देण्यात आला रिझर्व्ह बँकेने यापूर्वीही बँकांना सायबर धोक्यांपासून सावध केले आहे. आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर टी रविशंकर यांनी गेल्या महिन्याच्या सुरुवातीला एका कार्यक्रमात म्हटले होते की, बँकिंग क्षेत्राने नवीन सायबर धोक्यांसाठी तयार राहावे. 9 फेब्रुवारी रोजी 19 व्या बँकिंग तंत्रज्ञान परिषदेत ते बोलत होते.

टॅग्स :भारतीय रिझर्व्ह बँकसायबर क्राइमबँकबँकिंग क्षेत्र