RBI on inactive accounts : वेगवेगळ्या कारणांसाठी लोक बँक खाती उघडत राहतात. मात्र, अनेकदा काही खात्यांमध्ये वर्षानुवर्षे व्यवहारच होत नाही. काही दिवसांपूर्वी आलेल्या रिपोर्टमध्ये अशा बँक खांत्यांची संख्या लाखोत असल्याचे समोर आले आहे. अशा परिस्थितीत बँक खाते निष्क्रिय होते. अशा निष्क्रिय खात्यांबाबत आता रिझर्व्ह बँकेने नाराजी व्यक्त केली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने बँकांना 'तात्काळ' आवश्यक पावले उचलून निष्क्रिय किंवा 'गोठवलेल्या' खात्यांची संख्या कमी करण्यास आणि त्रैमासिक आधारावर त्यांच्या संख्येबद्दल माहिती देण्यास सांगितले आहे.
अशा खात्यांमध्ये पडून असलेल्या पैशांच्या वाढत्या रकमेबद्दल आरबीआयने चिंता व्यक्त केली आहे. आरबीआयच्या पर्यवेक्षण विभागाने नुकतेच एक विश्लेषण केले. यामध्ये असे दिसून आले की बऱ्याच बँकांमधील निष्क्रिय खाती/दावा न केलेल्या ठेवींची संख्या त्यांच्या एकूण ठेवींपेक्षाही जास्त आहे.
खाती निष्क्रिय का केली जातात?
बँकेच्या धोरणानुसार १२ ते २४ महिन्यांच्या कालावधीत खात्यात ग्राहकाने कोणताही व्यवहार न केल्यास बँक खाते निष्क्रिय मानले जाते. या कालावधीत खात्यात कोणताही व्यवहार न झाल्यास खाते निष्क्रिय मानले जाते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अशा खात्यांच्या वाढत्या संख्येबद्दल चिंता व्यक्त केली आहे, ज्यात एक वर्ष किंवा त्याहून अधिक काळ व्यवहार झाले नाहीत. वास्तविक, यापैकी मोठ्या प्रमाणात खाती सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांच्या खात्यांची आहेत, जी डीबीटी (थेट लाभ हस्तांतरण) शी जोडलेली आहेत. यापैकी बहुतांश खाती KVI अपडेट न केल्यामुळे निष्क्रिय आहेत. आरबीआयने बँकांना अशा खातेदारांची केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगितले आहे.
RBI बँकांना काय म्हणाले?
सर्व बँकांच्या प्रमुखांना जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, "बँकांनी निष्क्रिय खात्यांची संख्या कमी करण्यासाठी आवश्यक ती पाऊले उचलावीत. अशी खाती सक्रिय करण्याची प्रक्रिया सुलभ आणि त्रासमुक्त करण्यासाठी त्वरित हालचाल करण्याचा सल्ला देखील देण्यात आला आहे." यामध्ये बँका मोबाइल/इंटरनेट बँकिंग, क्रॉस शाखा आणि व्हिडिओ ग्राहक ओळख प्रक्रियेद्वारे केवायसी (नो युवर कस्टमर) अपडेट करण्याचा विचार करू शकतात, असंही सांगितलं आहे.