आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेबाबत मोठी वक्तव्य केली आहेत. जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था टाईमबॉम्बच्या उंबरठ्यावर उभी आहे. अमेरिकेत नुकत्याच तीन मोठ्या बँका कोसळल्या असून या देशासमोर अनेक आव्हाने उभी असल्याचं राजन म्हणाले.
“डॉमिनो इम्पॅक्टमुळे बँकांसमोर अनेक प्रकारची आव्हानं आहेत,” असं राजन म्हणाले. डीबीएस बँकेचे चीफ इकॉनॉमिस्ट तैमूर बेग यांच्यासोबतच्या एका पॉडकास्टमध्ये राजन यांनी यावर भाष्य केलं. “अमेरिकेत बँकिंग संकट येण्याची अपेक्षाच होती. या संकटामुळे आर्थिक स्थिती सांभाळणं कठीण होऊ याची अधिकाऱ्यांना जाणीव होती. आता जे प्रयत्न केले जातायत ते रिस्कलेस कॅपिटलिज्मला प्रवृत्त करतायत,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.
दीर्घ काळाच्या समस्या कायम
“अमेरिकन अधिकारी या बँकिंग संकटाचा योग्यरित्या सामना करत नाहीत. शॉर्ट टर्मची समस्या डिपॉझिटवरील इन्शुरन्सनं सोडवण्यात आली आहे. परंतु लाँग टर्म समस्या अद्यापही कायम आहेत. बँकांना खातेधारकांचे पैसे सांभाळणं आणि वाढवणं समस्या बनत आहेत. खातेधारकांना आपले पैसे सुरक्षित हवे आहेत,” असं राजन यांनी स्पष्ट केलं.
नफ्याचं मोठं आव्हान
अमेरिकेत सेफ असेट्सवर व्याजदर मोठ्या प्रमाणात वाढलेत. यामुळे गुंतवणूकदार आपले पैसे तिकडे गुंतवतायत. अशात बँकांसमोर दीर्घ काळात नफा कायम ठेवणं आव्हान बनेल. सतत्यानं व्याजदरात होणारी वाढ संकट निर्माण करत आहे. त्या संकटाचा सामना करणं कठीण असेल आणि त्यासाठी कठोर उपाय करावे लागणार असल्याचंही रघुराम राजन यांनी नमूद केलं.