Join us

रिझर्व्ह बँकेने महाराष्ट्रातील 'या' बँकेचा लायसन्स केला रद्द, ग्राहकांवर होणार मोठा परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2022 12:37 PM

११ नोव्हेंबरपासून ही बँक बंद झाली आहे. रिझर्व्ह बँकेनं ग्राहकांसाठी दिली मोठी माहिती.

RBI Cancelled Bank License: तुम्हीही बँक खातेधारक असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) महाराष्ट्रातील एका बँकेचा परवाना रद्द केला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) बाबाजी दाते महिला सहकारी बँक लिमिटेड, यवतमाळ, महाराष्ट्राचा परवाना रद्द केला आहे. या बँकेकडे पुरेसे भांडवल आणि कमाईची क्षमता नाही, त्यामुळे हे पाऊल उचलण्यात आले असल्याची माहिती शुक्रवारी रिझव्‍‌र्ह बँकेने दिली.

बँकेने जारी केलेल्या आकडेवारीचा हवाला देऊन, रिझर्व्ह बँकेने सांगितले की सुमारे 79 टक्के ठेवीदारांना त्यांच्या ठेवींची संपूर्ण रक्कम ठेव विमा आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशनकडून (DICGC) मिळण्याचा अधिकार आहे. DICGC ने 16 ऑक्टोबर 2022 पर्यंत एकूण विमा रकमेपैकी 294.64 कोटी रुपये आधीच भरले आहेत.

काय आहे कारण?रिझर्व्ह बँकेने दिलेल्या माहितीनुसार, त्याचा परवाना रद्द केल्यामुळे, बाबाजी दाते महिला सहकारी बँक लि.ला 'बँकिंग'चा व्यवसाय करण्यास मनाई करण्यात आली आहे. यामध्ये अन्य गोष्टींबरोबरच ठेवी स्वीकारण्यास आणि देयके देण्यास तात्काळ प्रतिबंध करण्यात आल्याचे रिझर्व्ह बँकेने म्हटलेय.

ग्राहकांवर काय परिणाम होणार?सध्याच्या आर्थिक स्थितीनुसार बँक तिच्या विद्यमान ठेवीदारांना पूर्ण देयके देऊ शकणार नाही आणि बँकेला बँकिंग व्यवसाय चालू ठेवण्याची परवानगी दिल्यास सार्वजनिक हितावर विपरित परिणाम होईल असे रिझर्व्ह बँकेने म्हटलेय. रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी (11 नोव्हेंबर 2022) व्यवसाय बंद झाल्यानंतर बाबाजी दाते महिला सहकारी बँकेचा परवाना रद्द केल्याची घोषणा केली, कारण बँकेकडे पुरेसे भांडवल आणि कमाईची शक्यता नाही.

टॅग्स :भारतीय रिझर्व्ह बँकबँक