Join us  

RBI Penalty on Banks: आरबीआयची पाच बँकांवर कारवाई, लाखोंचा दंड ठोठावला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2022 8:51 AM

RBI Penalty on Banks: बँकिंग नियमांकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) पाच सहकारी मोठ्या बँकांवर कारवाई करत दंड ठोठावला आहे. बँकिंग नियमांकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या माहितीनुसार, बंगळुरू येथील कर्नाटक स्टेट को-ऑपरेटिव्ह एपेक्स बँकेला 25 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. हाऊसिंग फायनान्सशी संबंधित बँकिंग तरतुदींचे पालन न केल्याबद्दल बँक दोषी आढळली आहे.

याचबरोबर, अनधिकृत इलेक्ट्रॉनिक बँकिंग व्यवहारांमध्ये ग्राहकांच्या हिताची काळजी न घेतल्याबद्दल ठाणे भारत सहकारी बँक लिमिटेडला  (Thane Bharat Sahakari Bank Limited) 15 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच, झाशी येथील राणी लक्ष्मीबाई अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेवर (Rani Laxmibai Urban Co-operative Bank) 5 लाख रुपये, तामिळनाडूच्या तंजोर येथील निकोल्सन को-ऑपरेटिव्ह टाऊन बँकेवर (Nicholson Co-operative Town Bank) 2 लाख रुपये आणि राउरकेला येथील द अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेला (The Urban Co-operative Bank) 10,000 रुपयांचा दंड रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ठोठावला आहे.

दरम्यान, बँकिंग नियामकाच्या नियमांच्या तरतुदींचे उल्लंघन केल्यामुळे या सहकारी बँकांवर दंड आकारण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने म्हटले आहे. यापूर्वी, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नियमांचे पालन न केल्याबद्दल आठ सहकारी बँकांवर दंड ठोठावला होता. यात विशाखापट्टणम सहकारी बँकेला सर्वाधिक 55 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता.

गेल्या महिन्यात महाराष्ट्रातील एका सहकारी बँकेवर कारवाई! रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने गेल्या महिन्यात महाराष्ट्रातील एका सहकारी बँकेवर कारवाई केली होती. पुण्यातील रुपी को-ऑपरेटिव्ह बँकेचा थेट परवानाच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रद्द केला. मुंबई हायकोर्टाने दिलेल्या आदेशानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने याबाबत निर्णय घेतला. संबंधित आदेशानंतर बँकेच्या वरिष्ठांना, सहकार आयुक्त, सहकारी संस्थांचे निबंधक यांना बँक बंद करण्याचा आदेश जारी करण्यात आला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा हा आदेश २२ सप्टेंबर २०२२ पासून लागू होईल, अशी माहिती समोर आली आहे.

टॅग्स :भारतीय रिझर्व्ह बँकबँक