अमेरिकेन फेडरल रिझर्व्हनं सलग दुसऱ्यांदा व्याजदरात कपात केली आहे. ज्यानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून (RBI) लोकांच्या अपेक्षाही मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. पण देशातील सर्वात मोठी सरकारी बँक एसबीआयचे चेअरमन सीएस शेट्टी यांच्या मते भारतात व्याजदरात कपात करण्यासाठी लोकांना फेब्रुवारीपर्यंत वाट पाहावी लागू शकते. फेब्रुवारीमध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया २५ बेसिस पॉईंट्सची कपात करू शकते, असंही ते म्हणाले.
शुक्रवारी एसबीआयचे तिमाही निकाल जाहीर केले. "आमचा स्वतःचा विश्वास आहे की व्याजदरात पहिली कपात फेब्रुवारीमध्ये दिसू शकते. म्हणजेच ठेवीदाराला विना कपात अधिक व्याज मिळत राहिल. मात्र, कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना फेब्रुवारीपर्यंत वाट पाहावी लागणार आहे,” असं शेट्टी म्हणाले.
गव्हर्नरांनी दिला इशारा
रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी वाढत्या महागाईविरोधात इशारा दिला असतानाच सीएस शेट्टी यांनी हे वक्तव्य केलं आहे. सप्टेंबर महिन्यात महागाई दर ५.५ टक्के होता. रिझर्व्ह बँकेनं चालू आर्थिक वर्षात महागाई दर ४.५ टक्के राहिल असा अंदाज व्यक्त केला होता. वाढलेला जागतिक तणाव, वस्तूंच्या किमती आणि अनपेक्षित पावसामुळे महागाईवर परिणाम झाल्याचं रिझर्व्ह बँकेचं मत आहे. रिझर्व्ह बँकेकडून निर्णय झाल्यास फेब्रुवारी २०२३ नंतर पहिल्यांदाच व्याजदरात कपात होणार आहे.
व्याजदरात कोणतीही कपात केली तरी बँकेच्या आर्थिक स्थितीवर अत्यंत मर्यादित परिणाम होईल. ४२ टक्के कर्ज मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंग रेटशी जोडलेलं आहे, असंही शेट्टी म्हणाले.