Join us

RBI Monetary Policy : RBI कडून तुर्तास दिलासा नाहीच, EMI कमी होण्यासाठी आणखी वाट पाहावी लागणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2024 10:05 AM

RBI Monetary Policy : RBI Monetary Policy : भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची (एमपीसी) तीन दिवसीय बैठक बुधवारी सुरू झाली. यानंतर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकात दास यांनी या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांची माहिती दिली. यावेळीही रेपो दरात कोणताही बदल करण्यात आला नसल्याचं यावेळी जाहीर करण्यात आलं.

RBI Monetary Policy : भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची (एमपीसी) तीन दिवसीय बैठक बुधवारी सुरू झाली. यानंतर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकात दास यांनी या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांची माहिती दिली. गेल्या काही महिन्यांपासून सर्व जण ईएमआय कमी होणार का याच्या प्रतीक्षेत होते. परंतु ईएमआय कमी होण्यासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. रिझर्व्ह बँकेनं यावेळी आठव्यांदा रेपो दरात कोणतेही बदल केलेले नाही. यावेळी रेपो दर ६.५ टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला. समितीच्या ६ पैकी ४ सदस्यांनी रेपो दर स्थिर ठेवण्याच्या बाजूनं मतदान केल्याची माहिती दास यांनी यावेळी दिली. 

"अर्थव्यवस्थेची कामगिरी उत्तम असून सध्या महागाई आणि वाढीदरम्यान संतुलन राखण्यावर आमचं लक्ष आहे. आर्थिक वर्ष २०२५ मध्ये जीडीपी वाढीचा दर ७ टक्क्यांवरून वाढून ७.२ टक्के राहण्याचा अंदाज आहे," असं शक्तिकांत दास यावेळी म्हणाले. तसंच महागाई दर ४ टक्क्यांवर आणण्याचं रिझर्व्ह बँकेचं लक्ष्य असल्याचंगी त्यांनी यावेळी नमूद केलं.   

शब्तादी वर्ष जवळ येतंय 

"२०२४ मध्ये जागतिक वाढ काय राहिल आणि ती मजबूत राहण्याची शक्यता आहे. नवं आधुनिक तंत्रज्ञान, ट्रेड आणि फायनान्शिअच्या पद्धतींमध्ये बदल, तसच हवामान बदल, नव्या संधींसह आव्हानंही समोर आणत आहेत. आरबीआयचं शताब्दी वर्ष जवळ येतंय. असं असताना जागतिक पातळीवर भारताची उपस्थिती वाढवण्यासाठी रिझर्व्ह बँक पूर्वीपेक्षा अधिक सज्ज राहणार आहे," असं त्यांनी नमूद केलं. 

७.२ टक्के जीडीपी वाढीचा अंदाज 

रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांनी २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी ७.२ टक्के जीडीपी वाढीचा अंदाज व्यक्त केला आहे. मार्च-एप्रिलमध्ये किरकोळ महागाई कमी झाली असली तरी अन्नधान्याची महागाई अजूनही वाढत आहे. आर्थिक वर्ष २०२५ च्या एप्रिल ते जून तिमाहीसाठी जीडीपीचा अंदाज ७.३ टक्के, जुलै-सप्टेंबरसाठी ७.२ टक्के, ऑक्टोबर-डिसेंबरसाठी ७.३ टक्के आणि जानेवारी-मार्चसाठी ७.२ टक्के राहण्याचा अंदाज अंदाज यावेळी व्यक्त करण्यात आला.

 

फेब्रुवारी २०२३ पासून बदल नाही 

रिझर्व्ह बँकेनं फेब्रुवारी २०२३ मध्ये रेपो दरात ६.५ टक्क्यांपर्यंत वाढ केली होती आणि त्यानंतर सलग सात वेळा तो कायम ठेवला आहे. देशाची सध्याची आर्थिक स्थिती पाहता धोरणात्मक व्याज दरात (रेपो रेट) कपात केली जाण्याची शक्यता दिसत नसल्याचं यापूर्वी जाणकारांनी म्हटलं होतं. व्याजदर कपातीत सर्वांत मोठा अडथळा वाढत्या महागाईचा आहे. याशिवाय फेब्रुवारी २०२३ पासून रेपो दर ६.५ टक्के इतका उच्च असतानाही आर्थिक वृद्धीचा दर मजबूत आहे. फेब्रुवारी २०२३ पासून रेपो दर 'जैसे थे' ठेवण्यात आला आहे. हाच कल पुढे सुरू ठेवण्यास प्राधान्य राहू शकतो, असंही जाणकारांनी सांगितलं होतं. 

तिसऱ्या तिमाहीत व्याजदर कपात अपेक्षित 

वित्त वर्ष २०२४-२५ च्या तिसऱ्या तिमाहीत धोरणात्मक व्याजदरात कपात केली जाऊ शकते. कपातीची श्रृंखला जेव्हा सुरू होईल, तेव्हा ती नाममात्र असेल, असं एसबीआय रिसर्चनं जारी केलेल्या ताज्या विश्लेषणात म्हटलंय. 

काय म्हणाले तज्ज्ञ?रिझर्व्ह बॅंकेची व्याजदर आणि भूमिकेबाबतची स्थिती बाजाराच्या अपेक्षेनुसार होती, परंतु मतदानाच्या पद्धतीतील विभाजनामुळे पुढील धोरणांमध्ये बदल होण्याची शक्यता स्पष्टपणे दिसून येते. मजबूत वाढीमुळे एमपीसीला मॉन्सून आणि अर्थसंकल्पातून क्वालिटी ऑफ एक्सपेंडेचरबाबत अधिक स्पष्टता येईपर्यंत एमपीसीला वेट अँड वॉच मोडवर राहण्याची पुरेशी संधी मिळेल, असा आम्हाला विश्वास आहे. ऑक्टोबरच्या बैठकीपासून योग्य शिथिलता आणून भूमिका बदलण्यास वाव असल्याचं आम्हाला दिसत असल्याची प्रतिक्रिया कोटक महिंद्रा बँकेच्या चीफ इकॉनॉमिस्ट उपासना भारद्वाज यांनी दिली. 

टॅग्स :भारतीय रिझर्व्ह बँकशक्तिकांत दास