Join us  

एकीकडे RBI चा सामान्यांना दिलासा; दुसरीकडे 'या' सरकारी बँकेनं दिला झटका, वाढणार EMI

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2023 4:11 PM

बँकेच्या या निर्णयामुळे सध्याच्या कर्ज धारकांना आता अधिक ईएमआय भरावा लागेल. तर नवीन कर्ज ग्राहकांना अधिक व्याजदरानं मिळेल.

गुरुवारी रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची तीन दिवसीय बैठक पार पडली. यानंतर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी रेपो दरात कोणाताही बदल केला नसल्याचं सांगत सामान्यांना तुर्तास दिलासा दिला. परंतु यानंतर आता सार्वजनिक क्षेत्रातील बँकेनं व्याजदर वाढवण्याचा निर्णय घेतलाय. बँक ऑफ बडोदाच्या (BoB) लाखो ग्राहकांना मोठा झटका बसला आहे. कारण, बँकेनं अनेक मुदतीच्या कर्जांचे व्याजदर वाढवले ​​आहेत. बँकेच्या या निर्णयामुळे सध्याच्या कर्ज धारकांना आता अधिक ईएमआय भरावा लागेल. तर नवीन कर्ज ग्राहकांना अधिक व्याजदरानं मिळेल.

रिझर्व्ह बँकेनं रेपो रेटमध्ये कोणताही बदल केला नाही आणि जुनेच दर कायम ठेवले आहेत. साधारणपणे, जेव्हा रेपो रेट वाढतो, तेव्हा बँका प्रत्येक कर्जावरील व्याजदरात वाढ करतात. त्यामुळे ईएमआयही वाढतो.. परंतु, रेपो दरात कोणताही बदल न करूनही, बँक ऑफ बडोदानं (BoB) ठराविक कालावधीसाठी बेंचमार्क कर्ज दर 5 bps नं वाढवले ​​आहेत. नवीन दर 12 ऑगस्ट 2023 पासून लागू केले जाणार असल्याची माहिती बँकेनं दिली.

नवे एमसीएलआर दरबँक ऑफ बडोदाच्या (BoB) बेंचमार्क दरांमध्ये वाढ झाल्यानंतर, फंड बेस्ड लोन दर म्हणजेच MCLR ओव्हरनाईट टेन्योरसाठी 8 टक्क्यापर्यंत वाढला आहे. तर, एका वर्षाच्या कालावधीसाठी एमएलसीआर दर 8.70 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. एका महिन्याच्या कालावधीसाठी एमएलसीआर 8.25 टक्के तर तीन महिन्यांच्या कालावधीसाठी एमएलसीआर 8.35 टक्के आणि सहा महिन्यांच्या कालावधीसाठी एमएलसीआर 8.45 टक्के करण्यात आलाय. त्याच वेळी, एमएलसीआर दर एका वर्षासाठी 8.7 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आलाय.

कोणावर होणार परिणामबँक ऑफ बडोदाच्या एमएलसीआर वाढीचा परिणाम फक्त अशा ग्राहकांना होईल ज्यांचे व्याजदर एमएलसीआर वर आधारित आहेत. 1 ऑक्टोबर 2019 पासून, बँकांना त्यांच्या कर्जावरील व्याजदर रेपो रेट, तीन किंवा सहा महिन्यांची ट्रेझरी बिले किंवा इतर कोणत्याही बाह्य बेंचमार्कशी जोडण्याचे स्वातंत्र्य देण्यात आलं आहे. रेपो रेटवर आधारित कर्जावरील व्याजदरात कोणताही बदल झालेला नाही.

टॅग्स :बँक