Join us  

RBI MPC Meeting Highlights : चेक क्लिअरन्सवर RBI चा मोठा निर्णय, आता काही तासांतच अकाऊंटमध्ये येणार पैसे; जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2024 1:02 PM

RBI MPC Meeting Highlights : रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी पतधोरण समितीच्या बैठकीतील महत्त्वाच्या मुद्द्यांबाबत आज माहिती दिली. यावेळी त्यांनी चेक बाबत महत्त्वाची माहिती दिली.

RBI Monetary Policy: रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास (RBI Shaktikanta Das) यांनी पतधोरण समितीच्या (RBI Policy Today) बैठकीतील महत्त्वाच्या मुद्द्यांबाबत आज माहिती दिली. यावेळी त्यांनी चेक बाबत महत्त्वाची माहिती दिली. आता चेक क्लिअरन्स काही तासांमध्ये होणार आहे. चेक क्लिअरिंगसाठी लागणारा वेळ काही तासांपर्यंत कमी करण्यासाठी आणि संबंधित जोखीम कमी करण्यासाठी पावलं उचलण्याची घोषणा रिझर्व्ह बँकेनं केलीये. सध्या चेक जमा होण्यापासून रक्कम येईपर्यंत दोन दिवसांचा कालावधी लागतो. पण नव्या प्रणालीत चेक जमा केल्यानंतर काही तासांतच तो 'क्लिअर' केला जाणार आहे.

RBI नं काय म्हटलं?

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर (RBI Governor) शक्तिकांत दास यांनी गुरुवारी चालू आर्थिक वर्षाचा तिसरा पतधोरण आढावा जाहीर केला. चेक क्लिअरिंग सुरळीत करण्यासाठी, सेटलमेंट जोखीम कमी करण्यासाठी आणि ग्राहकांना चांगल्या सेवा देण्यासाठी चेक ट्रंकेशन सिस्टमच्या (CTS) विद्यमान कार्यपद्धतीत बदल प्रस्तावित आहेत. सध्याच्या सीटीएस व्यवस्थेत बॅचमध्ये प्रक्रिया करण्याऐवजी कामकाजाच्या वेळेत सातत्यानं क्लिअरिंग केलं जाईल, असं दास म्हणाले.

नव्या व्यवस्थेत कसं होणार काम?

नव्या प्रणालीनुसार चेक स्कॅन करून ते प्रेझेंट केले जातील आणि काही तासांत क्लिअर केले जातील. यामुळे सध्याच्या दोन दिवसांच्या (T+1) तुलनेत काही तासांत चेक क्लिअरिंग होईल. यासंदर्भात सविस्तर मार्गदर्शक तत्त्वं लवकरच जारी केली जातील, असं दास (RBI Governor) यांनी सांगितलं. याशिवाय बँकांनी दर पंधरवड्याला आपल्या ग्राहकांची माहिती क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपन्यांना द्यावी, असा प्रस्ताव रिझर्व्ह बँकेनं ठेवला आहे. सध्या हा अहवाल महिन्यातून एकदा दिला जातो.

टॅग्स :भारतीय रिझर्व्ह बँकशक्तिकांत दास