भारतीय रिझर्व्ह बँकच्या (RBI) पतधोरण समितीची (MPC) बैठक मंगळवारपासून पार पडणार आहे. पतधोरण समितीची तीन दिवसीय बैठक ६ फेब्रुवारी ते ८ फेब्रुवारी दरम्यान चालणार आहे. तज्ज्ञांच्या मते, सध्या ईएमआय (EMI) वाढण्याची फारशी आशा नाही. आरबीआय मागील वाढीच्या एका वर्षानंतर या आठवड्यात दर कायम ठेवू शकते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) या आठवड्यात व्याजदरात कोणताही बदल करणार नसल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. सरकारनं अर्थसंकल्पात तूट कमी केली असली तरी लवकरच दर कमी होतील अशी अपेक्षा होती, मात्र तसं होताना दिसत नाही.
दरम्यान, बहुतेक बँकर्स आणि अर्थतज्ज्ञांचा असा विश्वास आहे की दर कपात वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत होऊ शकते. यावेळी व्याजदर कमी होण्याची आशा फारशी दिसत नाही. याचं पहिले कारण म्हणजे विदेशी व्यापारातील समस्या. येमेनच्या हुथी बंडखोरांनी जहाजांवर हल्ला केल्यामुळे जागतिक पुरवठा साखळीत व्यत्यय येण्याचा धोका आहे. याचा परिणाम भारतीय आयातीवर होऊ शकतो.
अमेरिकन फेडरल रिझर्व्ह आणि ब्रिटनच्या मध्यवर्ती बँकांनी लवकर दर कमी होणार नसल्याचे संकेत दिलेत. महागाई हळूहळू कमी होत असल्यानं, तसंच अर्थव्यवस्थेची स्थिती उत्तम असल्यानं रिझर्व्ह बँकेलाही दिलासा मिळताना दिसतोय. दरम्यान, वर्षाच्या अखेरीस व्याजदर कमी होतील अशी अपेक्षा आहे.
फेब्रुवारीत झालेला बदल
आरबीआयनं अखेरचा रेपो दर फेब्रुवारी २०२४ मध्ये ६.५ टक्क्यांपर्यंत वाढवला होता. तर गेल्या १२ महिन्यांत रेपो दर कायम राहिला आहे. आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखालील एमपीसीची तीन दिवसीय बैठक ६ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. शक्तीकांत दास ८ फेब्रुवारी रोजी बैठकीतील निर्णय जाहीर करतील.