Join us  

तीन पेमेंट ऑपरेटर्सवर नियमभंगाचा ठपका; आरबीआयकडून दंडात्मक कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2024 7:50 AM

व्हीसा वर्ल्डवाइड, ओला फायनांशियल सर्व्हिसेस आणि मनप्पुरम फायनान्स या त्या पीएसओ होत.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : नियमभंग करणाऱ्या ३ पेमेंट सिस्टम ऑपरेटरांना (पीएसओ) भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) दंड ठोठावला आहे. व्हीसा वर्ल्डवाइड, ओला फायनांशियल सर्व्हिसेस आणि मनप्पुरम फायनान्स या त्या पीएसओ होत.

आरबीआयने एक अधिकृत निवेदन जारी करून ही माहिती दिली. सूत्रांनी सांगितले की, केवायसी नियमाच्या उल्लंघनाबाबत मनप्पुरम फायनान्स लि. आणि ओला फायनान्शिअल सर्व्हिसेसला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. दंड का ठोठावला जाऊ नये, अशी विचारणा केली होती. दोन्ही पीएसओंनी नोटिसीला उत्तरही दिले होते. व्हिसा वर्ल्डवाइडने रिझर्व्ह बँकेची अनुमती न घेताच एक ‘पडताळणी यंत्रणा’ लागू केली होती. त्यावरून रिझर्व्ह बँकेने कंपनीला नोटीस बजावली होती. कंपनीच्या उत्तराने समाधान न झाल्यामुळे रिझर्व्ह बँकेने दंड ठोठावला. 

कुणावर किती दंड?

वर्ष २०१६ मध्ये केवायसी नियमांचा भंग केल्याबद्दल मनप्पुरम फायनान्स लिमिटेडला ४१.५० लाख रुपयांचा दंड आकारला आहे. याच कारणासाठी ओला फायनान्स सर्व्हिसेसला ३३.४० लाख रुपयांचा दंड ठोठाण्यात आला आहे. विना कार्ड देवाणघेवाणविषयक नियमांचा भंग केल्याबद्दल ओला फायनान्सला आणखी ५४.१५ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. याच आरोपाखाली व्हिसा वर्ल्डवाईडला २४०.७५ लाख रुपयांचा दंड ठाेठावण्यात आला आहे.

 

टॅग्स :भारतीय रिझर्व्ह बँक