RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया(RBI) च्या रिपोर्टमधून एक धक्कादायक बाब समोर आली आहे. देश भरातील विविध बँकांमध्ये हजारो कोटी रुपयांच्या ठेवी पडून आहेत, ज्यांच्यावर अद्याप कुणीही दावा केलेला नाही. RBI च्या रिपोर्टनुसार, बँकांमध्ये दावा न केलेल्या ठेवींमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत 26 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मार्च 2024 पर्यंत ही रक्कम 78,213 कोटी रुपयांवर पोहोचली आहे.
गेल्या वर्षी मार्च 2023 पर्यंत डिपॉझिटर एजुकेशन अँड अवेअरनेस फंडात (DEAF) जमा झालेली रक्कम 62,225 कोटी रुपये होती. दरम्यान, ही अशी रक्कम असते, ज्यावर 10 किंवा त्याहून अधिक वर्षांपासून खातेधारक किंवा त्याच्या कुटुंबातील कुणी दावा केलेला नसतो. अशी रक्कम बँकांमधून आरबीआयच्या डिपॉझिटर एज्युकेशन अँड अवेअरनेस फंडात हस्तांतरित केली जाते.
डिपॉझिटर एज्युकेशन अँड अवेअरनेस फंड म्हणजे काय?भारतीय रिझर्व्ह बँकेने 2014 मध्ये डिपॉझिटर एज्युकेशन अँड अवेअरनेस फंड (DEAF) ची स्थापना केली. ज्या रकमेवर दहा किंवा अधिक वर्षांपासून कुणीही दावा केलेला नाही, असे पैसे आरबीआयकडे जमा केले जातात. मात्र, भविष्यात त्यावर कुणी दावा केला, तर त्याला ते पैसे परतही मिळतात.
या पैशावर दावा कसा करायचा?
- सर्व बँकांना नावे आणि पत्त्यांसह निष्क्रिय खाती आणि दावा न केलेल्या खात्यांची यादी जारी करणे आवश्यक आहे.
- तुमचे नाव अशा कोणत्या यादीत असेल, तर ते जाणून घेण्यासाठी बँकेच्या वेबसाइटला भेट द्या.
- तुम्हाला तुमचे किंवा नातेवाईकाचे नाव आढळल्यास, बँकेच्या जवळच्या शाखेला भेट देऊन या पैशांवर दावा करता येतो.
- केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे सबमिट करावी लागतात.
- खातेदाराचा मृत्यू झाला असेल आणि नोंदणीकृत नॉमिनी नसेल, किंवा नोंदणीकृत नॉमिनीचाही मृत्यू झाला असेल तर, उत्तराधिकार प्रमाणपत्र किंवा नोटरीकृत मृत्यू प्रमाणपत्राद्वारे रकमेवर दावा केला जाऊ शकतो.
- जर रक्कम मोठी असेल, तर काही बँकांना कुटुंबातील सर्व सदस्यांकडून ना हरकत प्रमाणपत्र देखील आवश्यक असू शकते.
- बँकेद्वारे सर्व कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर रक्कम व्याजासह मिळते.