Join us

Kotak Mahindra बँकेवर RBI ची मोठी कारवाई; नव्या क्रेडिट कार्डांसह, नवे ग्राहक जोडण्यावरही निर्बंध, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2024 4:30 PM

रिझर्व्ह बँकेनं खासगी क्षेत्रातील बँक कोटक महिंद्रा बँकेवर मोठी कारवाई केली आहे.

रिझर्व्ह बँकेनं कोटक महिंद्रा बँकेला (Kotak Mahindra Bank) मोठा झटका दिला आहे. आता बँक नवीन ग्राहकांना ऑनलाइन माध्यमातून जोडू शकणार नाही किंवा नवीन क्रेडिट कार्डही जारी करू शकणार नाही. 

रिझर्व्ह बँकेला कोटक महिंद्रा बँकेच्या आयटी प्रणालीमध्ये त्रुटी आढळल्या होत्या. यावर बँकेकडून उत्तरही मागवण्यात आलं होते. बँकेकडून मिळालेलं उत्तर रिझर्व्ह बँकेला समाधानकारक वाटलं नाही. २०२२ आणि २०२३ च्या आयटी प्रणालीतील तपासणीनंतर रिझर्व्ह बँकेनं ही कारवाई केली आहे. 

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं आज कोटक महिंद्रा बँक लिमिटेडला तिच्या ऑनलाइन आणि मोबाइल बँकिंग चॅनेलद्वारे नवीन ग्राहकांना ऑनबोर्डिंग करणं आणि नवीन क्रेडिट कार्ड जारी करणं तात्काळ प्रभावानं थांबवण्याचे निर्देश दिले असल्याची माहिती समोर आलीये. याशिवाय रिझर्व्ह बँकेनं बँकेला एक्स्टर्नल ऑडिट करण्याचेही निर्देश दिलेत.यापूर्वी एचडीएफसीवरही कारवाई 

डिसेंबर २०२० मध्ये, रिझर्व्ह बँकेनं HDFC बँकेला नवीन कार्ड जारी करण्यास आणि नवीन डिजिटल इनिशिएटिव्ह सुरू करण्यास बंदी घातली होती. आयटी आणि तंत्रज्ञानातील त्रुटींमुळेही ही कारवाई करण्यात आली. यानंतर, ११ मार्च २०२२ रोजी रिझर्व्ह बँकेनं एचडीएफसी बँकेवरील सर्व निर्बंध उठवले. कोटक महिंद्रा बँकेचा क्रेडिट कार्ड व्यवसाय एकूण व्यवसायाच्या सुमारे ३.८ टक्के आहे. देशातील एकूण क्रेडिट कार्ड मार्केटमध्ये बँकेचा वाटा सुमारे ४ टक्के आहे.

टॅग्स :भारतीय रिझर्व्ह बँक