Join us  

देशातील सर्वात मोठ्या फायनान्स कंपनीवर RBIची मोठी कारवाई, लोन देण्यावर बंदी; ग्राहकांवर होणार परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2023 8:24 AM

देशातील सर्वात मोठ्या नॉन-बँकिंग फायनान्स कंपनी विरोधात रिझर्व्ह बँकेनं मोठी कठोर कारवाई केली आहे.

देशातील सर्वात मोठी नॉन-बँकिंग फायनान्स कंपनी (NBFC) बजाज फायनान्स विरोधात रिझर्व्ह बँकेनं मोठी कठोर कारवाई केली आहे. रिझर्व्ह बँकेनं या एनबीएफसीला दोन उत्पादनांतर्गत कर्ज मंजूर करणे आणि वितरित करणं थांबवण्यास सांगितलं आहे. यामध्ये ईकॉम (eCom) आणि इंस्टा ईएमआय कार्डचा (Insta EMI Card) समावेश आहे. नियमांचं पालन न केल्यानं रिझर्व्ह बँकेकडून बजाज फायनान्सवर ही कारवाई करण्यात आली आहे. बजाज फायनान्स ही मार्केट कॅपनुसार देशातील सर्वात मोठी नॉन बँकिंग फायनान्स कंपनी आहे. दरम्यान, शुक्रवारच्या बंद किंमतीनुसार कंपनीचं मार्केट कॅप ४४६,४५६.७८ कोटी रुपये आहे आणि ती देशातील दहावी सर्वात मौल्यवान कंपनी आहे.काय म्हटलंय रिझर्व्ह बँकेनं?'कंपनीने भारतीय रिझर्व्ह बँकेच्या डिजिटल लोन मार्गदर्शक तत्त्वांच्या विद्यमान तरतुदींचं पालन न करणं, विशेषत: या दोन उत्पादनांतर्गत ग्राहकांना तथ्यांचे मुख्य तपशील जारी न करणं आणि कंपनीद्वारे मंजूर अन्य डिजिटल कर्जांच्या संदर्भात जारी केलेल्या तपशीलांतील त्रुटींमुळे ही कारवाई आवश्यक आहे. कमतरता दूर केल्यानंतर रिझर्व्ह बँकेकडून या निर्बंधांचे पुनरावलोकन केलं जाईल, असं जारी केलेल्या निवेदनात सांगण्यात आलंय.सर्वात मोठी एनबीएफसीबुधवारी बजाज फायनान्सचा शेअर १.८४ टक्क्यांच्या घसरणीसह ७,२२३.९५ रुपयांवर बंद झाला. त्याचा ५२ आठवड्यांचा उच्चांकी स्तर ८,१९० रुपये आहे आणि नीचांकी स्तर ५,४८७.२५ रुपये आहे. बजाज फायनान्स ही मार्केट कॅपनुसार देशातील सर्वात मोठी एनबीएफसी आहे आणि एकूण दहावी सर्वात मौल्यवान कंपनी आहे. मार्केट कॅपमध्ये फक्त रिलायन्स इंडस्ट्रीज, टीसीएस, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस, एचयूएल, आयटीसी, भारती एअरटेल आणि एसबीआय बजाज फायनान्सच्या पुढे आहेत.

टॅग्स :भारतीय रिझर्व्ह बँकबँक