Join us

RBI Action: आरबीआयची महाराष्ट्रातील बड्या सहकारी बँकेवर कठोर कारवाई; दोन राज्ये, सहा जिल्ह्यांत विस्तारलेली

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2022 1:04 PM

रिझर्व्ह बँकेने सांगितले की, नियमांचे उल्लंघन केल्याने, त्रुटी राहिल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.

आरबीआयने देशातील नऊ सहकारी बँकांवर कठोर दंडात्मक कारवाई केली आहे. सर्व बँकांचे नियमन रिझर्व्ह बँकेकडून केले जाते. यासाठी नियम बनविलेले असतात, त्यांचे उल्लंघन केले की ही दंडात्मक कारवाई केली जाते. अनेकदा बँकांचे परवानेही रद्द करण्यात आले आहेत. आजच्या या कारवाईत महाराष्ट्रातील एक सहकारी बँक देखील आहे. या सर्व बँकांवर आरबीआयने एकूण १२ लाख रुपयांचा दंड आकारला आहे. 

रिझर्व्ह बँकेने सांगितले की, नियमांचे उल्लंघन केल्याने, त्रुटी राहिल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. या बँकांनी त्यांच्या ग्राहकांसोबत केलेल्या कोणत्याही व्यवहाराच्या किंवा कराराच्या वैधतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणे हा या कारवाईमागचा उद्देश नाही. 

रिझर्व्ह बँकेने बेरहामपूर को-ऑपरेटिव्ह अर्बन बँक लिमिटेड (ओडिशा) वर रु.3.10 लाख, उस्मानाबाद जनता सहकारी बँक, महाराष्ट्राला रु.2.5 लाख आणि संतरामपूर अर्बनला रु.2 लाख दंड ठोठावला. को-ऑपरेटिव्ह बँक लि., महिसानगर (गुजरात) ला एक लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. जिल्हा सहकारी केंद्रीय बँक मर्यादित, बालाघाट (मध्य प्रदेश), जमशेदपूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि., जमशेदपूर (झारखंड) आणि रेणुका नागरीक सहकारी बँक मरियडित, अंबिकापूर (छत्तीसगड) या बँकांना प्रत्येकी एक लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. उस्मानाबाद जनता सहकारी बँक ही महाराष्ट्रतील पाच जिल्ह्यांत आणि कर्नाटकमधील बिदर जिल्ह्यात कार्यरत आहे. 

कृष्णा मर्कंटाइल को-ऑपरेटिव्ह बँक लि., मध्य प्रदेश आणि केंद्रेपाडा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि., ओडिशा यांना 50,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. नवानगर को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, गुजरातला 25,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

टॅग्स :भारतीय रिझर्व्ह बँकबँक